सध्या नाशिकमध्ये या पक्ष्यांची रेलचेल सुरु झालीय. दिसायला अतिशय सुंदर! अगदी
नावाप्रमाणे अग्निपंखी! याचे इंग्रजी नाव फ्लेमिंगो आणि लोकप्रिय नाव विंग्ज ऑफ
फायर. उडताना या पंखांमध्ये खरेच आग धगधगते आहे असेच वाटते. सर्वसाधारणपणे हा
पक्षी स्थलांतरीत पक्षी नाही. पण सध्या हवामानात होणाऱ्या मोठ्या बदलांमुळे तो
जिथे त्याचे अन्न असेल तिथे स्थलांतर करतो. आपल्या नाशिकमध्ये साधारण डिसेम्बर ते
फेब्रुवारी हा काळ खास रोहित पक्ष्यांचा मोसम असतो. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी
यांचे वास्तव्य आहे. सर्वात प्रसिद्ध जागा म्हणजे भिगवण, उरण, शिवडी,
नांदूर मध्यमेश्वर, जायकवाडी. इतरत्र बऱ्याच ठिकाणी हे पक्षी दिसतात. हा पक्षी
अक्षरशः वेड लावतो. दिसायला अतिशय देखणा, आकाराने मोठा. भव्य पंख आणि लाल भडक रंग.
हे सगळेच विलक्षण असते. शिवाय यांचे मोठे थवे असतात. त्यामुळे सगळेच मोहवून टाकणारे
असते. विशेषतः यांचे उड्डाण आणि पाण्यामध्ये उतरणे (take off and landing) हे देखील तासनतास बघत राहावे
असे वैशिष्ट्यपूर्ण असते. यामुळे फोटोग्राफर्सचा हा अत्यंत प्रिय पक्षी आहे.
याचे शास्त्रीय नाव आहे Phoenicopterus Phoenicoparrus, फिनिकोप्टेरस
फिनिकोपारस. आफ्रिकेमध्ये हा पक्षी मोठ्या प्रमाणत दिसतो. भारतामध्ये कच्छच्या लहान रणामध्ये
यांचे वास्तव्य असते. पाणी कमी झाले की चिखलाची लहान किल्ल्यासारखी रचना बांधतात
आणि त्यात त्यांची अंडी उबवतात. रोहित पक्षी या सगळ्या पक्षी जमातीमधील उंच पक्षी
आहे. साधारण पाच फूट उंच असतो. पण वजन मात्र केवळ १.८ ते ३.६ किलो इतकेच असते. हे
गरजेचे असते. हलके असण्यामुळे हे पक्षी लाखो किलोमीटर अंतर उडत पार करत असतात. हा
पक्षी अगदी हुशार आहे. तो अशा ठिकाणी राहतो जिथे इतर पक्ष्यांचे अन्न फारसे नसते.
त्यामुळे त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी इतर शिकारी पक्षी फारसे येत नाहीत आणि
त्यामुळे ते स्वतः सुरक्षित राहतात. यांची चोच वैशिष्ट्यपूर्ण असते त्यामुळे ते
चिखलामध्ये देखील अन्न शोधून उचलू शकतात. यांचे मुख्य अन्न म्हणजे लहान मासे आणि
शैवाल. म्हणूनच हे पक्षी पाणथळ जागांमध्ये आढळतात. यांची चोच म्हणजे एक प्रकारची
गाळणी असते. ते जेव्हा अन्न चोचीने उचलून घेतात तेव्हा त्यात त्यांचे मुख्य अन्न,
चिखल आणि पाणी असते. यामध्ये पाणी व माती ते बाहेर टाकून देतात व अन्न म्हणजे मासा
किंवा शैवाल फक्त आत घेतात. या शैवालामध्ये आणि प्लँक्टनमध्ये बीटा कॅरोटीन असते.
यामुळे रोहित पक्ष्यांचे पंख लाल गुलाबी असतात. जेवढे अधिक बीटा कॅरोटीन तेवढे
त्यांचे पंख गुलाबी लाल असतात. त्यांच्या पंखाखाली काळी पिसे असतात आणि जेव्हा ते
उंच उडतात तेव्हाच ही काळी पिसे दिसतात. अगदी संपूर्ण शरीर गुलाबी दिसणारे रोहित देखील
असतात. आपल्याकडे येणारे रोहित मात्र संपूर्ण लाल किंवा गुलाबी नसतात तर पांढऱ्या
आणि लाल अशा मिश्रित रंगांचे असतात. पक्षी संग्रहालायात ठेवलेल्या रोहित
पक्ष्यांना जर जिवंत कोलंबी मासे दिले नाहीत तर ते संपूर्ण पांढरे पडतील.
तुम्ही जर शेकडो रोहित पक्ष्यांचा थवा पाण्यामध्ये फिरताना पाहिला तर
तुमच्या लक्षात येईल की हे एक सुंदर नृत्य असते. गंमत म्हणजे एखाद्या समूह
नृत्याप्रमाणे हे पक्षी अगदी एकसारखे नृत्य करीत असतात. यामध्येच ते आपला जोडीदार
निवडतात. नर आणि मादी दोघे मिळून अंड्यासाठी चिखलाचे घरटे बांधतात. दोघेही त्या
अंड्याची काळजी घेतात. बरेचदा मादी जर अंड्यावर बसलेली असेल तर नर कोणी शिकारी
पक्षी येणार नाही याकडे काटेकोरपणे लक्ष देत असतो. अंड्यातून जेव्हा पिल्लू बाहेर
येते तेव्हा दोघेही नर आणि मादी आपापल्या घशामध्ये एक विशिष्ट प्रकारचे दुध तयार
करतात आणि ते पिल्लाला देतात. या दुधाला क्रॉप मिल्क असे म्हणतात. पिल्लांचा रंग राखाडी-पांढरा
असतो. पण पिल्लू थोडेसे मोठे झाले की ते “फ्लेमिंगी फूड” म्हणजे मासे, शैवाल खायला
लागते आणि मग गुलाबी, लाल दिसायला लागते. याला साधारण वर्षतरी लागते. तुम्ही कोणी रोहित पक्षी पाहिला नसेल तर जरूर पहा. एकदा का तुम्ही त्याचे दर्शन घेतले की दर वर्षी वारी कराल हे निश्चित!
(फोटो: सुजाता, मिलिंद आणि रोहित बाबर)
तुमचा लेख वाचून हा सुंदर डौलदार पक्षी पाहण्याची तीव्र इच्छा झाली आहे.
ReplyDeleteधन्यवाद !
हा पक्षी अतिशय सुंदर दिसतो शिवाय त्याचे उड्डाण अगदी पाहण्यासारखे असते. तुम्ही भिगवणला जाऊन पहा. एका वेळेस हजारो फ्लेमिंगो दिसतील.
Delete