Thursday, 16 February 2017

गोड गळ्याचा दयाळ

पल्याला गोड गळ्याचा पक्षी म्हटले की कोकीळ आठवतो. पण इतर अनेक पक्षी आहेत ज्यांचे आवाज किंवा कॉल्स अत्यंत गोड आहेत. यातला एक सुरेल गाणारा पक्षी म्हणजे दयाळ. काळ्यापांढऱ्या रंगाचा पण अगदी डौलदार. आमच्या बागेत तर यांचे गुंजन सतत चालूच असते. इकडून तिकडे बागडत असतात. कित्येकदा यांच्या आवाजाने सकाळी सकाळी मस्त जाग येते. दिवसाची सुरुवात अशा सुरेल गजराने होणे याशिवाय काय हवे?
असा हा दयाळ किंवा रॉबिन. पूर्ण नाव ओरिएन्टल मॅगपाय रॉबिन. याचा समावेश म्युझिकापिडी (Musicapidae) या पक्षिकुलात आणि टर्डिडी या उपकुलात समावेश होतो. शास्त्रीय नाव कॉप्सिकस सॉलॅरिस (Copsychus saularis)
याच्या काही वैशिष्ट्यांवरून या पक्ष्याची बोलीभाषेमध्ये अनेक नावे आहेत. गोडी लोक उसळी म्हणतात. भिल्ल लोक काबरो म्हणतात. पारधी कालाचिडी म्हणतात. नाशिकमध्ये काळचिडी तर पुण्यात दयाळ म्हणतात. चंद्रपूर मध्ये दहीगोल, माडिया भाषेत दहेंडी आणि सिंधुदुर्गमध्ये मडवळ म्हणतात. अंगावर दही सांडल्यासारखे पांढरे स्वरूप असल्याने याला दाधिक असेही म्हणतात. संस्कृतमध्ये दाधिक म्हणजे दही विकणारा.  
काळा, सुमधुर दयाळ 


हा पक्षी तसा सगळीकडे दिसतो. पानझड, तलाव, नदीकाठ, झुडुपे, वाळलेली झाडे, बगीचा अशा अनेक ठिकाणी आढळतो. आम्ही बागेत काही लाकडी घरे ठेवली होती. त्यातल्या एका घरामध्ये याने आपले घरटे केले होते. आकाराने चिमणीपेक्षा थोडासा मोठा असतो. साधारण २० सेंमी. लांब असतो. नर पक्षी अधिक काळा असतो. डोके, मान, पाठ काळी असते. तर मादीचा डोक्याचा भाग करड्या रंगाचा असतो. सतत हालचाल हे याचे वैशिष्ट्य आहे. अगदी स्थिर बसला तरी शेपटी सतत वरखाली हलवीत असतो. 
सतत शेपटी हलवित असतो 
याच्या मधुर आवाजामुळे चटकन ओळखू येतो. आवाज अगदी स्पष्ट आणि खणखणीत व लांब शीळ घातल्यासारखा असतो. शिवाय इतर पक्ष्यांच्या नकला देखील करतो. शिवाय जवळपास मांजर किंवा मुंगुस दिसले की आपल्या आवाजाने इतरांना सावधान करतो. आणि हा पक्षी केवळ गोड आवाज काढत नाही. तर त्याला घाबरलेले, आक्रमक, सावधानतेचा इशारा देणारे, नम्र, विनंती करणारे, संकटाची जाणीव करून देणारे असे अनेक आवाज काढता येतात.
वीणीच्या हंगामात मादीला साद घालतो आहे 
यांचा विणीचा हंगाम म्हणजे फेब्रुवारी ते ऑगस्ट. एका वेळी ३ ते ५ अंडी घालतात अंडी पिवळट पंढरी किंवा अगदी फिक्या हिरव्या रंगाची असतात. उबवण्याचा काळ ८ - १५ दिवसांचा असतो. याचे आयुष्य साधारण १० वर्षांचे असते.
याचे आवडते खाद्य म्हणजे कीटक, अळ्या, मुंग्या, टोळ. तसेच फुलांच्या मधला रस, मध हेदेखील त्याला खूप आवडते. हे पक्षी जवळपास असावेत असे वाटत असेल तर पांगारा, काटेसावर झाडे लावावीत. यांच्या फुलांमधला रस याला खूप आवडतो. तसेच आकार जरी लहान असला तरी बेडूक आणि सरडे हे देखील याचे खाद्य आहे. यामुळे याला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते.

साधासा  अधिवास 
गोड गळ्याचा पक्षी असल्याने पूर्वी या पक्ष्याला पकडून पिंजऱ्यात ठेवत असत. दयाळ पक्षी बांगला देश, भारत, श्रीलंका आणि पूर्व पाकिस्तान, पूर्व इंडोनेशिया ते थायलंड, दक्षिण चीन, मलेशिया आणि सिंगापूरपर्यंत दिसतो. आता ऑस्ट्रेलियामध्येदेखील दिसतो. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दयाळ हा बांगला देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. तिथे दोयेल चटवार नावाने ओळखला जातो. बांगला देशामध्ये अनेक ठिकाणी सांकेतिक चिन्ह म्हणून या पक्ष्याला स्थान दिले आहे. बांगला देशाच्या नोटांवर याचे चित्र आहे. तसेच ढाका शहरात या पक्ष्यांचे मोठे शिल्प आहे आणि एक मोठी ओळखीची खूण म्हणून सांगितले जाते. असा हा सुंदर आणि गोड पक्षी.

फोटो आणि व्हिडिओ: सुजाता बाबर  



1 comment:

  1. Very Interesting Bird and your story. Thanks Sahil Joshi

    ReplyDelete