Saturday, 24 December 2016

खंड्या आणि बंड्या



खंड्या आणि बंड्या! किती गोड नावे आहेत ही! ७० - ८० सालच्या सिनेमात दोन दोस्तांना शोभून दिसणारी टोपणनावे!

अगदी आपल्या शेजारच्या गल्लीत यांच्यासोबत आता खेळायला जाऊ असे वाटणारी नावे. ही नावे आहेत मोहक पक्ष्याची. हा पक्षी म्हणजे किंगफिशर. खंड्या म्हणजे निळसर रंगाचा किंगफिशर आणि बंड्या म्हणजे राखाडी आणि काळ्या रंगाचा किंगफिशर. हे पक्षी Alcedinidae या फॅमिलीचे आहेत. आपल्याकडे तीन प्रकार जास्त प्रमाणात पहायला मिळतात. एक असतो सामान्य खंड्या, दुसरा असतो लहान खंड्या आणि तिसरा असतो राखाडी आणि पांढरा बंड्या. आमच्या बागेत आम्ही एका कुंडीत कमळे लावली आहेत, तिथे हा पक्षी नित्यनेमाने येतो. शिवाय खूप झाडी आणि गारवा असल्याने खंड्या बरेचदा मागच्या एका उंच झाडावर कधीकधी बसतो. अनेकदा कमळाच्या कुंडीजवळच्या तारेच्या कुंपणावर देखील बसलेला असतो. आमची लवकरच ओळख झाल्याने तो बराच वेळ तिथे बसत शीळ घालत असतो. एखादा खुळखुळा वाजवा तशी याची शीळ असते. ती पण मी बरेचदा रेकॉर्ड केली. कुठेही पाणथळ जागेवर, तळ्याकाठी किंवा नदी किनारी गेलो की हे पक्षी हमखास दिसतात. एखाद्या वाळलेल्या आणि  पाण्याबाहेर चार पाच फूट उंचीवरच्या झाडाच्या टोकावर बसलेले असतात. भेदक नजरेने पाण्यात भक्ष्य शोधात असतात आणि एखादा मासा, खेकडा दिसला की सूर मारून टिपून घेतात. तसे हे माणसाच्या फार जवळ जात नाहीत. खूप लाजाळू असतात. पण माणसांना खूप घाबरतही नाहीत.


अतिशय देखणे निळ्या मोरपिशी रंगांचे आणि अत्यंत चमकदार पंख, गडग गुलाबी रंगाची चोच आणि तपकिरी रंगाचे डोके व मान यामुळे हे पक्षी सहज लक्ष वेधून घेतात. यांच्या पंखाची विशिष्ट रचना असते. त्यामुळे त्यावर पडणारा प्रकाश हा परावर्तीत होवून चमकतो. त्यामुळे हा पक्षी फारसा शोधावा लागत नाही. याची चोच ही कडक आणि एखाद्या भाल्यासारखी कठीण असते, त्त्यामुळे ते सहज मासा किंवा खेकडा पकडू शकतात. यामध्ये मादी ही अधिक रंगीत आणि आकर्षक दिसते. इतर पक्ष्यांमध्ये बहुधा उलटे पहायला मिळते. किंगफिशरच्या जोड्या नदीकाठी एकत्रित बिळे तयार करतात. ही बिळे ३ ते ८ फूट इतकी लांब असू शकतात. किंगफिशर पक्ष्याची दृष्टी अगदी वैशिष्ट्यपूर्ण असते. हा पक्षी पाण्याबाहेर किंवा हवेत असतो तेव्हा याचे दोन्ही डोळे स्वतंत्रपणे काम करतात (Monocular) आणि पाण्यामध्ये असतो तेव्हा दोन्ही डोळे एकच काम करतात (Binocular). सामान्य किंगफिशरला स्वतःच्या वजनाच्या ६०% वजनाचे अन्न रोज खावे लागते. हा पक्षी वजनाला अगदी हलका असतो. त्याची अंडी तर खूपच हलकी असतात. अंड्याचा आकार १.९ सेंटीमीटर ते २.२ सेंटीमीटर इतका असतो आणि वजन हे साधारण ४.३ ग्रॅम इतके असते. मादी एका वेळी ५ ते ७ अंडी घालते, क्वचित १० अंडी पण घालते. साधारण २० दिवसांनी पिल्लू बाहेर येते आणि पुढे २४ – २५ दिवस घरट्यातच राहते. ते इतके भुकेले असते की कधीकधी दिवसाला १०० माश्यांची मागणी करते! 
पालक किंगफिशर प्रेमाने एवढे मासे पकडून आणून खाऊ घालतात. या पक्ष्याचे आयुष्य साधारण २० वर्षांचे असते. सर्वात अधिक जगलेला किंगफिशर २१ वर्षांचा होता. काही भागांमध्ये हे पक्षी स्थलांतर करतात. विशेषतः हिवाळ्यामध्ये जेव्हा पाणी गोठते तेव्हा ते स्थलांतर करून पाणथळ जागी जातात. कधीकधी हे पक्षी ३००० किमी इतके स्थलांतर करतात.


बंड्या जरी रंगीत नसला तरी त्यावर ठिपक्यांसारखे आणि पट्टेरी काळे रंग पसरलेले असल्याने हा पक्षी देखील देखणा आणि अत्यंत डौलदार दिसतो. 



फोटो व व्हिडीओ: सुजाता बाबर

4 comments:

  1. शाळेत असताना घराला लागून असणा-या पडवीत एका पांढ-या कबूतरा सारख्या दिसणा-या परंतू आकाराने लहान असणा-या पक्षाने घरटे केले होते आम्ही नेहमी त्याचे निरीक्षण करायचो त्याने घातलेली अंडी त्याचे गवताच्या काड्यांचे घर तुमचा लेख वाचून आठवले.
    धन्यवाद !

    ReplyDelete
    Replies
    1. पक्ष्यांचे जीवन फार निरीक्षण करण्यासारखे असते आणि त्यातून खूप शिकता येते.

      Delete