उगाचच काहीतरी भौतिक वस्तूस्वरूपात भेटवस्तू देण्यापेक्षा मला मित्रमैत्रिणींना अशा गिफ्ट्स द्यायला आवडते. नांदूर मध्यमेश्वर हे नाशिकच्या अगदी जवळ म्हणजे अवघ्या ४५ किलोमीटर अंतरावर आहे. कॅमेरा, बायनाक्युलर आणि भरपूर नाश्ता घेवून आम्ही निघालो. नेहमीप्रमाणे सोबत Birds of Indian Subcontinent हे Richard Grimmett, Carol Inskipp आणि Tim Inskipp पुस्तक होतेच, हे माझे एक अत्यंत आवडते पुस्तक आहे.
नांदूर मध्यमेश्वरला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हणतात. १९०७ ते १९१३ या दरम्यान निफाड तालुक्यातील कादवा आणि गोदावरी नद्यांच्या संगमावर नांदूर मध्यमेश्वर हे धरण बांधले गेले. ही एक पाणथळ जागा आहे. पाणी उथळ आहे. त्यामुळे जवळच्या मांजरगाव आणि चापडगाव या गावापर्यंत हे पाणी पोहोचते. उथळ पाणी असल्याने इथे पक्षी मोठ्या प्रमाणात
आढळतात. इथले पाणी उन्हाळ्यात प्रचंड आटते. अगदी आतपर्यंत सहज चालत जाता येते. या काळात सुद्धा अनेक पक्षी दिसतात. यावर्षी भरपूर पाउस झाल्याने आता तरी भरपूर पाणी होते. या पाण्यात गोदावरीचा गाळ वाहून येतो आणि त्यामुळे दलदल तयार होते. यात अनेक सेंद्रिय घटकही आहेत. या सगळ्यामुळे इथे पाणवनस्पतींना स्थैर्य मिळते आणि त्यामुळे जैविक समृद्धी निर्माण होण्यास अत्यंत पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्षी निरीक्षकांसाठी नांदूर मध्यमेश्वर ही जणू पंढरी आहे. त्यामुळे अगदी दरवर्षी वारी करणारे अनेक
पक्षी निरीक्षक इथे येतात. आम्ही वर्षातून चार पाच वेळा तर नक्कीच जातो. गेल्या दोन वर्षांमध्ये इथे बऱ्यापैकी सुधारणा आणि सोयीसुविधा निर्माण होत आहेत. निरीक्षणासाठी नव्याने काही मचाण बांधले आहेत. यावेळी एक जुना मचाण दुरुस्त केलेला दिसला. आता राहण्यासाठी तंबूदेखील बांधले आहेत. तसेच बसण्यासाठी सिमेंटच्या लहान शेड्सदेखील बांधल्या आहेत. एवढेच नाही तर अभयारण्याला वळण्याच्या पूर्वी दोन लहानशी हॉटेल्स देखील तयार झाली आहेत. शिवाय आतमध्ये एक लहानसे कॅन्टीनही आहे.
मुख्य रस्त्यावरून अभयारण्यात शिरल्या शिरल्या अनेक पक्षी भेटतातच. आमच्या स्वागताला कापशी घार होतीच. शिवाय खाटिक, पिवळा धोबी, सातभाई असे अनेक पक्षी होते. आत गेलो तर हुदहुद गवतामध्ये त्याचे भक्ष्य शोधीत खात होता. यावेळेस आम्हाला मोठ्या प्रमाण पेंटेड स्टोर्क किंवा चित्रबलाक दिसले. तळ्यामध्ये लहान लहान बेटासारखे चिखलाचे उंचावटे आहेत. त्यावर हे पक्षी मस्तपैकी उन्हाचा आस्वाद घेत मासे पकडण्यात गुंग होते. हे पक्षी साधारण १०० सेंटीमीटर उंचीचे असतात. यांची चोच लांब आणि पिवळ्या रंगाची असते. केशरी डोके, काळे पांढरे पंख आणि गुलाबी पिसांची शेपटी यामुळे एखाद्या चित्रकाराने रंगवावे असे हे पक्षी दिसतात. यांचे आवडते अन्न म्हणजे मासे, बेडूक आणि साप. यांचे आकाशातील उडणारे थवे अत्यंत देखणे दिसतात आणि फोटोग्राफर्स हे क्षण टिपण्यासाठी अत्यंत आतुर असतात. याचबरोबर आम्हाला पाणकावळे, पांढरा शराटी, काळा शराटी, छोटा शराटी, चमचा बदक, गाय बगळा, राखी बगळा, खंड्या असेही पक्षी दिसले. पाण्यामध्ये मस्त पोहत असलेली अनेक प्रकारची बदके पहिली. यात पट्ट कदंबांची शिस्तबद्ध रांग पाहायला मजा येते. शिवाय चक्रवाक, हळदी कुंकू, चक्रांग बदक, वारकरी, थापट्या, कमळ पक्षी पाहिले. याचसोबत जांभळी पाणकोंबडी, टिटवी, तीरचिमणी, होला, भारद्वाज, वेडा राघू, ब्राह्मणी मैना, गप्पीदास, काळा गप्पीदास, कोतवाल हे नेहमीचे पक्षी देखील पाहिले. दलदल ससाण्याची जोडी घिरट्या घालून आपले सावज शोधताना दिसत होती. निघताना अगदी शेवटी मात्र आम्हाला एका सर्प गरुडाने दर्शन दिले आणि वारी पावली असे म्हणत परतलो. अर्थातच ही पंढरीच्या वारीसारखी नित्यनेमाचे वारी असल्याने नांदूर मध्यमेश्वर विषयी अजून पुढे लिहीनच.
फोटो: सुजाता बाबर