काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा सकाळी
सकाळी अनेक गिरण्या एकाच वेळी चालू आहेत असा भास झाला. खरे तर त्या आवाजाने मला
जाग आली. अर्थातच एवढ्या सकाळी कुठे गिरणी चालू असणार! हा तर तांबट पक्षी. पण एवढा
आवाज? मी खिडकीबाहेर पहिले, आणि आश्चर्याने माझे डोळे विस्फारले ते कितीतरी वेळ मिटलेच
नाहीत. सकाळची वेळ असल्याने फारसा उजेड नव्हता
पण एकाच झाडावर अक्षरशः शंभर एक तांबट सहज असतील.
 |
एका झाडावर सुमारे शंभर तांबट! |
काही फोटो पण घेतले. पक्षी निरीक्षणाची ओढ
जेव्हा लागली तेव्हा तांबट पक्ष्याची हलकीशी झलक जरी दिसली तरी मला खूप आनंद
व्हायचा. याचा आवाज अगदी गमतीशीर. तांब्यावर घाव घालावेत असा आवाज. पण मला तर तो
गिरणीसारखा (ऑईल इंजिन) वाटतो. आवाज आला की मी तांबट शोधात बसायची. दाट पानांमध्ये
लपून बसण्याची सवय असल्याने तसा शोधायला वेळच लागतो. हा पक्षी दिसायला देखील खूपच
सुंदर असतो. सामान्यपणे जो तांबट दिसतो, तो पोपटासारखा हिरवा असतो. त्यामुळे
पानांमध्ये लपला की पटकन ओळखता येत नाही. ही तांबटाची गिरणी तासनतास चालू राहते.
 |
अतिशय देखणे रूप |
या पक्ष्याचे शास्त्रीय नाव आहे Megalaima haemacephala indica. इंग्रजीमध्ये कॉपरस्मिथ बार्बेट किंवा क्रिमसन ब्रेस्टेड बार्बेट. तांब्यावर घाव घातल्यासारखा आवाज काढतो म्हणून हे नाव आले. आपल्याकडे
सामान्यपणे दिसणारा. थोडस शहराबाहेर पडले की याचा आवाज हमखास येतो. गिरणीसारख्या
लयीत पुक पुक असा आवाज काढतो म्हणून त्याला बोली भाषेत पुकपुक्या असेही म्हणतात. नर आणि मादी फारसे वेगळे दिसत
नाहीत. कपाळ आणि छाती किरमिजी रंगाची, डोळ्यांवर आणि खाली पिवळे पट्टे आणि
पिवळा कंठ. आणि हिरवेगार अंग. यामुळे अतिशय देखणा दिसतो. चोचीवर मिशांसारखे केस हे
देखील याचे वैशिष्ट्य.
 |
तांबट पक्षाची जोडी |
फ्रेंच भाषेत दाढीला बार्बेट म्हणतात म्हणून याच्या
नावामध्ये बार्बेट आले. या मिशा कीटक पकडण्यासाठी उपयोगी असतात. काही ठिकाणी यांचे
वेगवेगळे रंग दिसून येतात. दक्षिण भारतात गेलात तर अजून तीन प्रकारचे तांबट पक्षी
पाहायला मिळतील. एक म्हणजे जे तपकिरी रंगाचे डोके, छाती, कंठ असलेला, दुसरा म्हणजे पांढऱ्या रंगांची डोळ्यांची
वरची कडा आणि गाल असलेला, तिसरा म्हणजे गळा व छाती किरमिजी रंगाची पण त्यावर काळा
आणि निळा पट्टा असलेला.
त्यांचे घरटे पोकळ असते.
यासाठी पोखरायला सोपे अशा मऊ खोड असलेल्या झाडाच्या खोडामध्ये घरटे बनवितात. शक्यतो
जोडीने आढळतात. साधारणपणे अंजीर, जांभूळ, उंबर, वड, पिंपळ अशा
झाडांवर आढळून येतो. हे पक्षी खाण्याचे शौकीन असतात. त्यांना फळे खूप आवडतात. तुती, वड-पिंपळाची
फळे, फुलांच्या पाकळ्या आवडीने खातात. तसेच किडे-कीटक देखील आवडतात. गंमत म्हणजे
शरीराच्या दीड ते दोन पट आहार असतो. यांच्या विणीचा हंगाम म्हणजे फेब्रुवारी ते
एप्रिल. नर आणि मादी दोघेही अंडी उबवण्याचे काम करतात.
या पक्ष्याचा आवाज अगदी
लक्षात येण्यासारखा असतो. पुक...पुक... असा लयबद्ध आवाज काढताना त्याची मान एकदा
डावीकडे तर एकदा उजवीकडे फिरते. हे बघणे म्हणजे मजेशीर अनुभव असतो. काहीजण हा आवाज ‘टोंक... टोंक...’ आहे असे मानतात तर काहीजण टुक..टुक आहे असे मानतात.
 |
अप्रतिम सौंदर्याचा नमुना |
२०११ मध्ये झालेल्या पक्ष्यांच्या गणनेनुसार मुंबईमध्ये हा पक्षी मोठ्या प्रमाणत आढळल्याने याला मुंबईचा पक्षी म्हणून ओळखले जाते.
फोटो : सुजाता व मिलिंद बाबर व्हिडिओ: सुजाता बाबर
Mastach!
ReplyDelete