एकदा आमच्या खिडकीसमोराच्या झाडावर सकाळी सकाळी अनेक
पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायला लागला. जणू काही ते पक्षी घाबरून आपला जीव वाचवत
आहेत असेच वाटत होते. बाहेर जाऊन पाहिले तर एक मोठा शिक्रा पक्षी झाडावर येऊन बसला
होता आणि लहानसे पक्षी जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे उडत होते. पण अखेरीस धूर्त
शिक्र्याने एका लहानशा चिमणीला अचूक पकडले आणि मजेत खाल्ले. हे पाहणे नकोसे वाटत
असले तरी निसर्ग चक्राचा हा एक भाग आहे.
आमच्या खिडकीसमोरच्या निलगिरी झाडाच्या वरच्या फांद्यामध्ये
शिक्रा पक्षाने घरटे केले होते. काही दिवसांनी त्याची तीन पिल्ले बागेमध्ये नाचू
बागडू लागली. हा पक्षी अगदी भारदस्त दिसतो. कोठूनही ओळखायला येतो. नावाप्रमाणे
शिकारी पक्षी.
![]() |
मादी पक्षी. यात मान १८० डिग्री मध्ये फिरलेली दिसते आहे. |
हा दिसतो जितका भारदस्त तितका त्याचा आवाज अगदी साधा, मंजूळ पण
वरच्या स्वरातला. गंमत म्हणजे कोतवाल पक्षी याची हुबेहूब नक्कल करतो आणि इतर लहान
पक्ष्यांना घाबरवून सोडतो. या पक्ष्याचे मराठी नाव मला तरी कुठे सापडले नाही.
हा पक्षी प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडात सापडतो. याचे
शास्त्रीय नाव आहे अॅक्सीपिटर बेडीअस (Accipiter badius). या प्रकारामध्ये गरुड, ससाणा, घार, आणि ऑस्प्रे पक्षी येतात. २०१६ मध्ये जवळपास
दहा वर्षांनी ऑस्प्रे नांदूर मध्यमेश्वरला आला होता. शिक्रा पक्ष्याचा आकार साधारण
२६ ते ३० सेंटीमीटर इतका असतो. लहानसे पंख आणि झुपकेदार पण लहान शेपटीमुळे तो
ओळखता येतो. अंगावर पट्टे असतात. पोट आणि खालचा भाग पुढून बरचसा पांढरट रंगाचा
असतो. नर आणि मादी ओळखणे अगदी सोपे असते. नर पक्ष्याचे डोळे लाल असतात तर मादी
पक्ष्याचे डोळे पिवळसर रंगाचे असतात. दोघांचे डोळे भेदक असतात. आणि टोकेरी आणि
बाकदार चोचीमुळे तर ते आणखीनच उठून दिसतात. मादी आकाराने थोडी मोठी असते. शिवाय
दोघांचे पंखांचे रंग देखील वेगळे असतात.
नर पक्षी |
हा पक्षी तसा कुठेही आढळतो. शहरामध्ये दाट झाडी असतील तरी
दिसतो किंवा अगदी घनदाट जंगल असले तरी दिसतो. नेहमी जोडीमध्ये दिसतो. याचे उड्डाण
अगदी भव्य दिसते. यांचे भक्ष्य म्हणजे ससे, खारी, लहान पक्षी, लहान सरपटणारे प्राणी जसे पाली, साप व
कीटक. उड्डाणामध्ये असो किंवा स्थिर बसलेला असो, या
पक्ष्यांची नजर अतिशय तीक्ष्ण आणि भेदक असते. इतकी की मानवाच्या नजरेपेक्षा आठ पट तीक्ष्ण! याच्यापासून
वाचण्यासाठी अनेक पक्षी आपले रंग बदलतात किंवा त्यांच्या रंगांसारख्या रंगांच्या झाडांमध्ये
लपून बसतात. खंड्या पक्षी पटकन पाण्यात सूर मारतो. तर सातभाई पक्षी एक मोठी रॅली तयार
करतात आणि हाकलवून लावण्याचा प्रयत्न करतात. कोतवाल पक्षी नक्कल करून कधीकधी
शिक्र्याला हुलकावणी देवून त्याचे भक्ष्य पळवतो. शिक्रा पक्ष्याची मान अक्षरशः ३६०
डिग्रीमध्ये गोल फिरते.
या पक्ष्याचे घरटे अगदी साधे काड्यांचे असते. कधीकधी तारांचा
देखील उपयोग केला जातो. हे घरटे कावळ्याच्या घरट्यासारखे दिसते. घरटे बांधायला नर
आणि मादी दोघेही श्रम करतात. हे बहुतेक सगळ्या पक्ष्यांमध्ये दिसते. हे पक्षी एका
वेळी तीन चार अंडी देतात. आणि समजा एखादे अंडे कुणी पळवलेच किंवा इतर काही कारणाने
नाहीसे झाले तर त्याच्या बदली नवीन अंडे घालतात. एका सिझनला जास्तीत जास्त सात
अंडी घालतात. यांच्या उबवण्याचा कालावधी १८ ते २१ दिवसांचा असतो. आमच्या बागेतील
शिक्र्याने पिल्ले बाहेर आल्यावर सुरुवातीला त्यांना खायला घातले. हळूहळू ती
पिल्ले बाहेर पडून फांद्यांवर बसायला लागली. मग हळूहळू उडून शेजारच्या झाडावर
बसायला लागली. मग ही झेप हळूहळू वाढली. आईने आणि वडीलांनी यांना शिकार करायला
शिकवले. हे सगळे प्रशिक्षण पाहणेदेखील अद्भुत अनुभव म्हणायला हवा. किती सहज आणि
लवकर ही पिल्ले स्वावलंबी होतात. या पक्ष्यांचे आयुष्य केवळ २.५ ते ७ वर्षांचे
असते.
फोटो आणि व्हिडिओ - सुजाता बाबर
No comments:
Post a Comment