Thursday, 26 January 2017

शेपटी नृत्य करणारा धोबी

नाशिकमध्ये पक्षी निरीक्षणासाठी अनेक जागा आहेत. नाशिकच्या चहुबाजूला लहान मोठी अनेक धरणे  असल्याने पाणथळ जागा भरपूर आहेत. त्यामुळे अनेक पक्षी या जागेवर येतात आणि आपले जीवन जगत असतात. अशा जागी नेहमी दिसणारा पक्षी म्हणजे परीट किंवा धोबी पक्षी, इंग्रजीमध्ये व्हाईट वॅगटेल. याचे शास्त्रीय नाव आहे मोटॅसिला अल्बा (Motacilla alba). हा एक स्थलांतरित पक्षी आहे. पण आपल्याकडे मात्र जवळजवळ बारा महिने दिसतो. नांदूर मध्यमेश्वरला गेल्या गेल्या जो पुढचा भाग आहे, तिथे थोडा वेळ जरी बसले की धोबी हमखास दिसतो. यात दोन रंग असतात एक करडा किंवा पांढरा धोबी आणि दुसरा पिवळा धोबी. हिवाळ्यात हा पक्षी पाणथळी जागांजवळ दिसतो. त्याची शेपटी तो एखाद्या धोब्याच्या

पांढरा तरीही सुंदर दिसणारा धोबी

धोपटण्यासारखा जमिनीवर आपटत असतो आणि त्यामुळे याचे नावे धोबी किंवा परीट असे पडले आहे. इंग्रजी नावावरुन मात्र वॅगटेल म्हणजे 'सतत शेपटी हालविणारा' असा अर्थ होतो. विशेषतः आशियामध्ये आणि युरोपमध्ये हे पक्षी मोठ्या प्रमाणात दिसतात. 


यांच्या राहण्याच्या नेहमीच्या जागा म्हणजे खडकाळ जागा, गावातील माळराने आणि नद्या किंवा पाणथळ जागा. अगदी क्वचितच टुंड्रासारख्या प्रदेशात हे पक्षी समुद्राच्या कपारींमध्ये राहतात. पण सर्वसामान्यपणे त्यांना माणसांच्या आसपास राहायला आवडते. शहरांमधल्या बागांमध्ये देखील हा पक्षी दिसतो. शेताजवळ देखील अनेकदा दिसतो. आमच्या शेजारचा गुरखा एक गाय पाळतो. त्या गाईच्या शेणाच्या गवऱ्या थापतो. त्या गवऱ्यावरचे किडे खायला हे धोबी अगदी रोज येतात.  
या पक्ष्याची लांबी साधारणपणे १७ ते १८ सेंटीमीटर इतकी असते. पंख पसरले की मात्र ते २५  सेंटीमीटर लांब पसरतात. नर पक्ष्याचे वजन अवघे २० ते २५ ग्राम असते, तर मादी पक्ष्याचे वजन १७ ते २२ ग्राम.   
नर आणि मादी धोबी 

कपाळ, डोळे आणि चोच यामधील भाग, गाल, कानामागील भाग आणि डोक्याच्या बाजूचा भाग पांढऱ्या रंगाचे असतात. गळा हा काळा असतो. वरच्या भागातील काही दर्शनी भाग आणि वरील पंखाच्या आतला भाग करड्या रंगाचा असतो. वरचे पंख देखील करडा, काळा, आणि पंधरा या तिन्ही रंगांची विशिष्ट रचना तयार करतात. आणि कडेचे दोन पंख मात्र पांढरे शुभ्र असतात. रामगंगारा जसे सुंदर रचनाबद्ध असतात तसेच पांढरे धोबी देखील खूप सुंदर रचनाबद्ध असतात. खालच्या बाजूला चोचीखालचा भाग, गळा, छाती मात्र काळ्या रंगाचे असतात. पोटाकडचा भाग पांढरा असतो. छातीच्या आजूबाजूला फिकट करडा रंग असतो. चोच अगदी टोकदार आणि काळीशार असते. डोळे तपकिरी काळे असतात तसेच पाय देखील काळे असतात.




या पक्ष्याचा आवाज मंजुळ असतो. पण अगदी लहान लहान आलाप घेतल्यासारखा आवाज असतो. आवाजाचा स्वर मात्र अगदी खणखणीत आणि उच्च टीपेतला असतो. त्स्ली-वी आणि त्स्ली-वीट असे लहान लहान आवाज पुन्हा पुन्हा काढत असतो. कधीकधी अगदी लहान म्हणजे चीसिक–चीसिक आणि कर्कश चीझ्झिक असाही आवाज ऐकू येतो. 
असंख्य लहान पाणवनस्पती आणि जमिनीवर राहणारे अपृष्ठवंशी हे या पक्ष्याचे मुख्य अन्न. तसेच जमिनीवरचे किडे आणि पंखांवर बसलेले कीटक हे देखील यांचे अन्न आहे. जमिनीवर चालता चालता ते किडे पकडतात किंवा भक्ष्य दिसले की धावत जाऊन पकडतात. हे त्यांचे धावणे इतके आकर्षक असते की जणू काही नृत्य करत आहेत असा भास होतो. मला तर ते नृत्य म्हणजे एखादे सुंदर कॅटवॉकच वाटते. कधीकधी हवेतले किडे पकडण्यासाठी उडत झेपावत भक्ष्य पकडतात. पाणथळ पक्षी मात्र उथळ पाण्यातल्या पाणवनस्पती आणि अपृष्ठवंशी प्राणी खातात.
हे पक्षी जोडीने पण दिसतात किंवा एकटे सुद्धा भटकत असतात. पण स्थलांतर करताना मात्र लहान लहान थव्यांमध्ये राहतात. शहरांमध्ये यांचे वास्तव्य कारखान्यांच्या आतमध्ये किंवा झाडावर थव्यांमध्ये असते. तर नदीकाठी गवताल भागात किंवा शेतामध्ये गवताच्या गंजीवर, वेताच्या बनामध्ये पण एकत्र राहतात. या पक्ष्याचे उड्डाण अगदी लहरदार असते. लयबद्ध असते. पंख फारसे उंच किंवा खूप वरखाली होत नसले तरी वेगाने आणि फडफडत हे पक्षी उड्डाण करतात. 


घरटे अर्थातच दोघे मिळून बांधतात. डहाळी, गवत, पाने, लहान मुळी आणि मॉस यांच्यापासून कप तयार करतात. त्यामध्ये पिसे, लोकर किंवा केसांची मऊ गाडी तयार करतात. एका वेळेस ३ ते ८ अंडी घालतात. पांढऱ्या रंगांच्या अंड्यांवर गडद रंगाच्या खुणा असतात. उबवणी काळ १२ ते १५ दिवसांचा असतो. याची नर आणि मादी या दोघांनी जरी जबाबदारी घेतलेली असली रात्री मात्र मादी जबाबदारी घेते. पिल्ले बाहेर आली की अवघ्या दोन आठवड्यांमध्ये स्वतंत्रपणे पूर्ण किंवा प्रौढ पक्षी म्हणून जीवन सुरु करतात. पक्षी मोठा किंवा खूप रंगीत असेल तरच आकर्षक नसतो हे पांढरा धोबी सिद्ध करतो!

फोटो आणि व्हिडीओ: सुजाता बाबर

Thursday, 19 January 2017

मधुर रामगंगारा




आम्ही एकदा जैसलमेरला गेलो होतो. तिथे सम ड्यून्समध्ये आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सव होता आणि त्याचा एक भाग म्हणून रात्री आकाशदर्शन करण्यासाठी आम्हाला बोलावले होते. खगोलमंडळातर्फे आम्ही तिघेजण गेलो होतो. आमचे काम फक्त रात्री असायचे. आम्ही सगळ्यांपेक्षा दूरवर तंबू ठोकला होता. दुपारी बहुधा विश्रांती असायची. पहिल्याच दिवशी दुपारी तंबूमध्ये सहजच पडले असताना अगदी मधुर आवाज ऐकायला आला. माणसांच्या त्या संगीत मैफलीमध्ये एका पक्ष्याचा मधुर नैसर्गिक आवाज अतिशय गोड वाटत होता. तंबूतून बाहेर येऊन पाहिले तर एका वाळलेल्या झाडावर सुंदर टिट किंवा रामगंगारा पक्षी बसलेले होते.
फोटो काढायला गेले तर चटकन उडून गेले. आमच्या घरामागच्या झाडावर हे पक्षी नेहमी येत असतात. सकाळी सकाळी अशा गोड आवाजाने जाग येणे म्हणजे केवढे सुख असते! सगळा दिवसच गोड होऊन जातो. हा पक्षी म्हणजे निसर्गाची कमालच म्हणायला हवी. सममिती किंवा सिमेट्री शिकवायची असेल तर या पक्ष्याचे उदाहरण द्यावे इतकी सुंदर सममिती या पक्ष्याच्या पंखांवर असते. अक्षरशः भूमिती चित्रे आखावीत इतकी सुंदर डिझाइन्स या पक्ष्याच्या पंखांवर असतात. केवळ काळा, पांढरा आणि ग्रे रंगामधला हा पक्षी अतिशय सुंदर असतो. कोणतीही रंगीबेरंगी नक्षी नसताना देखील सौंदर्य काय असते याचा मूर्तीमंत नमुना म्हणजे राम गंगारा किंवा हा सिनेरीयस टिट. याचे द्विपदी नाव (Binomial name) आहे Parus cinereus. 
हा पक्षी ग्रेट टिट कुटुंबामधला पक्षी आहे. या पक्ष्याची पाठ ग्रे रंगाची असते आणि पोट पांढऱ्या रंगाचे असते. डोक्याचा अर्धा भाग काळ्या रंगाचा
असतो. मादी रामगंगाराच्या पोटावर एक अरुंद उदरस्थ रेषा असते आणि मादी ही किंचित रंगाने फिकी असते. शेपटी काळी असते पण वरच्या बाजूच्या शेपटीतले पंख मात्र फिकट काळे किंवा ग्रे रंगाचे असतात. मधल्या पंखांच्या ४ जोड्या बाहेरील बाजूने फिक्या रंगाच्या असतात. मधली पंखांची जोडी मात्र पांढरी असते. पाचव्या पंखांच्या जोडीला काळ्या शेंड्या असतात तर आतल्या बाजूने काळ्या रंगांचे पट्टे असतात. पंखांची सगळ्यात बाहेरची जोडी पांढऱ्या रंगाची असते आणि त्यात काळ्या बारीक रेषा असतात. खालच्या बाजूची शेपटी मध्यावर काळी तर दोन्ही कडांना पांढरी असते. या सगळ्या रंगसंगतीमुळे हा चिमणीएवढा पक्षी अतिशय देखणा दिसतो. ग्रेट टिट मात्र पिवळसर आणि हिरव्या छटा असलेला पक्षी असतो.     

या कुटुंबात अनेक प्रकारचे पक्षी आढळतात. शिवाय प्रत्येक भूप्रदेशाप्रमाणे त्यांचा ग्रे रंग गडद किंवा फिक्का होत जातो. भारतामध्ये हा अगदी सामान्यपणे दिसणारा पक्षी आहे.


बहुधा हे पक्षी जोडीमध्ये किंवा समूहामध्ये दिसतात. आमच्या घरामागे

आम्ही खास पक्षी येतील अशी झाडे लावली असल्याने रामगंगारा एकदम थव्यांमध्ये येतात आणि त्यांच्या आवाजाने सगळी बाग सुमधुर होऊन जाते. अशा टोळ्यांमध्ये ते झाडांवर आले की विचलित झालेल्या किटकांवर झडप घालतात. यात प्रामुख्याने सुरवंट, लहान किडे, कीटक यांना ते पकडतात. याशिवाय झाडांवरच्या कळ्या आणि फळे हे देखील यांचे आवडते खाद्य आहे. कधीकधी किड्यांना पायांनी पकडून ठेवतात आणि चोचीने बारीक तुकडे करून खातात. काहीवेळा काही कठीण किंवा टणक बियांवर चोचीने हातोड्यासारखे ठोकून बारीक तुकडे करून देखील खातात.   

सर्वात आकर्षक म्हणजे यांचे कॉल्स. लहान लहान विराम घेत तीन चार वेळा टीटीविसी.. टीटीविसी.. विट्सीसीसी अशा प्रकारचा आवाज काढत बागडत असतात.



विशेषतः प्रजनन काळात कॉलिंग कायम चालू असते. हे पक्षी एका वेळी साधारण ४ ते ६ अंडी घालतात. झाडांच्या कपारींमध्ये, भिंतींमध्ये किंवा घट्ट चिखलामध्ये हे पक्षी घरटी बांधतात. घरट्याचे दार अगदी छोटेसे असते आणि ते मॉस, केस आणि पिसे यांनी बंद करून ठेवलेले असते. याचे मुख्य कारण म्हणजे संरक्षण. कधीकधी सुतार किंवा तांबट पक्ष्यांची रिकामी जुनी घरटी देखील हे पक्षी वापरतात.    

या पक्ष्याचे फोटो घेणे म्हणजे कौशल्यच आहे. कारण हा पक्षी अगदी लाजाळू असतो. शिवाय पटकन इकडे तिकडे बागडत असतो. त्यामुळे स्थिर रामगंगारा दिसणे अगदी दुर्मिळ! 

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या पर्यावरण स्वच्छतेमध्ये ते मोठे योगदान देत असतात.

फोटो आणि व्हिडिओ: सुजाता बाबर

Tuesday, 10 January 2017

भिरभिर भिंगरी

भिंगरी हा एक माझा अतिशय आवडता पक्षी. अतिशय गोंडस दिसतो आणि ओळखायला अतिशय सोपा. भिंगरी नेहमी आकाशात विहरत असतो आणि हवेतल्या हवेत कीटक पकडून खाऊन टाकतो. आणखी एक खूण म्हणजे शेपटीमधून बाहेर आलेली तार, यामुळे अनेकदा याला तारवाली भिंगरी असेही म्हणतात. भिंगरी म्हटले की मला आमची ताडोबा सहल आठवते. पाण्याच्या ओहळाजवळ बारीकशा फांदीवर बसलेल्या अतिशय सुंदर भिंगऱ्या आम्ही पाहिल्या होत्या.
ताडोबाच्या जंगलातील भिंगारीची जोड़ी 
आणि दुसरे आठवते ते म्हणजे नांदूर मध्यमेश्वरला असलेली यांची वसाहत. धरणाच्या बाजूला मध्यमेश्वराचे मंदिर आहे. या मंदिराच्या पलीकडे कपारीमध्ये या भिंगरी पक्ष्यांची वसाहत आहे. ही वसाहत देखील बघण्यासारखी असते. तुम्ही जर नांदूर मध्यमेश्वरला गेलात तर नक्की पहा. 
नर भिंगरी


भिंगरी दिसायला अतिशय देखणा असतो. गडद चमकदार निळीशार पाठ, पांढरेशुभ्र पोट आणि केशरी तपकिरी लालसर डोक्याचा भाग. शेपटीच्या मधून तारेसारखी पिसे बाहेर आलेली असतात. यामुळे त्याला वायर टेल्ड स्वॅलो असेही म्हणतात.

नराची तार जरा लांब असते आणि मादीची छोटी. याचे शास्त्रीय नाव आहे हीरुंदो दौरीका (Hirundo daurica). आपण याला माळ भिंगरी असेही म्हणतो.
मादी भिंगरी


हवेतून किडे किंवा कीटक अगदी सहज पकडतात. मोठा आ वासून हवेत उडत असतात. आणि यांच्या चोचीजवळ उलटे मागे वळलेले केस असतात. यामुळे किडे यात अडकून बसतात आणि भिंगरीला मस्त आस्वाद घेता येतो. हा पक्षी नेहमी दिसत असला तरी हिवाळ्यामध्ये मात्र ते दक्षिणेकडे जाऊन उबदार उन्हाचा आनंद घेतात. आपल्याकडे हे पक्षी उत्तराखंडातून येतात. उत्तराखंडामध्ये या पक्ष्यांना शुभ मानले जाते. हे पक्षी हवेतल्या हवेत कीटकांना खाऊन टाकतात त्यामुळे पिकांचे संरक्षण होते. म्हणून कदाचित यांना शुभ पक्षी मानले जात असावे.

हे पक्षी सर्वसाधारणपणे कुठेही आढळतात. शिकार करून दमलेल्या या पक्ष्यांचा थवा संध्याकाळी हवेत उडताना पाहणे म्हणजे एक विलोभनीय दृष्ट्य असते. हे उड्डाण म्हणजे जणू काही एक सुंदर समूह नृत्य असते. वरखाली मागे पुढे, डावीकडे-उजवीकडे अतिशय मोहक हालचाली 
करत हा थवा आपापल्या घरी परत जात असतो. एखाद्या अस्सल कोरिओग्राफरला देखील जमणार नाही अशा नाजूक, डौलदार आणि तालामध्ये हे नृत्य असते. यांचे पाय नाजूक आणि लहान असतात यामुळे एखाद्या बारीक फांदीवर किंवा तारेवर घोळका करून बसलेले असतात. काही वेळा तर शेकडो भिंगऱ्या आपल्याला तारेवर बसलेल्या दिसतात. भिंगरीचा आवाज अतिशय मधुर असतो. तो वेगवेगळ्या प्रकारचे सुमधुर संगीत तयार करतो. आणि गंमत म्हणजे हे संगीत त्याच्या शारीरिक स्थितीची अवस्था सांगते. आणि हे केवळ नर आणि मादीला लक्षात येते. काहीवेळा गरज पडली तर अगदी बेरका, बॉम्बसारखा मोठा आवाज काढून शिकारी पक्ष्यांपासून संरक्षण देखील करतो. 
ताडोबाच्या जंगलातील भिंगरी 
हे पक्षी आपली घरटी एप्रिल ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये बांधतात. या पक्ष्याचे मुख्य स्थान पाण्याजवळ असते. चोचीमध्ये चिखल गोळा करून निमुळते दार असलेली घरटी बांधतात. हजारो भिंगऱ्या एकत्र घरटी बांधतात. यांना क्लिफ स्वॅलो असेही म्हणतात. वसाहतीमध्ये राहण्याचे मुख्य कारण म्हणजे माणसांपासून संरक्षण! यामधून भिंगरी डोके बाहेर काढून बसलेली असते. हे दृश्य फारच मनोहर असते. एका वेळी तीन ते चार अंडी घालतात. ती मऊशार पिसांवर असतात. नर आणि मादी दोघेही अंड्यांचे संरक्षण करतात. ही घरटी खूप वर्षे टिकणारी असतात. शेकडो वर्षे ती टिकून राहतात. याचे कारण म्हणजे घरटी बांधताना चिखलामध्ये त्यांच्या लाळेतील चिकट रसायन त्यात मिसळले जाते आणि त्यामुळे या घरट्यांना घट्टपणा मिळतो. ही घरटी मातीच्या भांड्यांसारखी दिसतात आणि म्हणून या पक्ष्याला भांडीक असेही नाव आहे.
भिंगरीची वसाहत - Cliff Swallow
सुंदर पक्षी म्हटले की मोर, खंड्या, पीटा आपल्या डोळ्यासमोर येतात. पण अगदी रोज दिसणारा, तारेवरचा चिमणीसारखा छोटासा हा पक्षी देखील अगदी मनमोहक असतो.

फोटो : रोहित बाबर

Tuesday, 3 January 2017

शिकारी शिक्रा



कदा आमच्या खिडकीसमोराच्या झाडावर सकाळी सकाळी अनेक पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यायला लागला. जणू काही ते पक्षी घाबरून आपला जीव वाचवत आहेत असेच वाटत होते. बाहेर जाऊन पाहिले तर एक मोठा शिक्रा पक्षी झाडावर येऊन बसला होता आणि लहानसे पक्षी जीव वाचवण्यासाठी इकडेतिकडे उडत होते. पण अखेरीस धूर्त शिक्र्याने एका लहानशा चिमणीला अचूक पकडले आणि मजेत खाल्ले. हे पाहणे नकोसे वाटत असले तरी निसर्ग चक्राचा हा एक भाग आहे.
आमच्या खिडकीसमोरच्या निलगिरी झाडाच्या वरच्या फांद्यामध्ये शिक्रा पक्षाने घरटे केले होते. काही दिवसांनी त्याची तीन पिल्ले बागेमध्ये नाचू बागडू लागली. हा पक्षी अगदी भारदस्त दिसतो. कोठूनही ओळखायला येतो. नावाप्रमाणे शिकारी पक्षी.



मादी पक्षी. यात मान १८० डिग्री मध्ये फिरलेली दिसते आहे.


हा दिसतो जितका भारदस्त तितका त्याचा आवाज अगदी साधा, मंजूळ पण वरच्या स्वरातला. गंमत म्हणजे कोतवाल पक्षी याची हुबेहूब नक्कल करतो आणि इतर लहान पक्ष्यांना घाबरवून सोडतो. या पक्ष्याचे मराठी नाव मला तरी कुठे सापडले नाही.


हा पक्षी प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका खंडात सापडतो. याचे शास्त्रीय नाव आहे अॅक्सीपिटर बेडीअस (Accipiter badius). या प्रकारामध्ये गरुड, ससाणा, घार, आणि ऑस्प्रे पक्षी येतात. २०१६ मध्ये जवळपास दहा वर्षांनी ऑस्प्रे नांदूर मध्यमेश्वरला आला होता. शिक्रा पक्ष्याचा आकार साधारण २६ ते ३० सेंटीमीटर इतका असतो. लहानसे पंख आणि झुपकेदार पण लहान शेपटीमुळे तो ओळखता येतो. अंगावर पट्टे असतात. पोट आणि खालचा भाग पुढून बरचसा पांढरट रंगाचा असतो. नर आणि मादी ओळखणे अगदी सोपे असते. नर पक्ष्याचे डोळे लाल असतात तर मादी पक्ष्याचे डोळे पिवळसर रंगाचे असतात. दोघांचे डोळे भेदक असतात. आणि टोकेरी आणि बाकदार चोचीमुळे तर ते आणखीनच उठून दिसतात. मादी आकाराने थोडी मोठी असते. शिवाय दोघांचे पंखांचे रंग देखील वेगळे असतात.


नर पक्षी
हा पक्षी तसा कुठेही आढळतो. शहरामध्ये दाट झाडी असतील तरी दिसतो किंवा अगदी घनदाट जंगल असले तरी दिसतो. नेहमी जोडीमध्ये दिसतो. याचे उड्डाण अगदी भव्य दिसते. यांचे भक्ष्य म्हणजे ससे, खारी, लहान पक्षी, लहान सरपटणारे प्राणी जसे पाली, साप व कीटक. उड्डाणामध्ये असो किंवा स्थिर बसलेला असो, या पक्ष्यांची नजर अतिशय तीक्ष्ण आणि भेदक असते. इतकी की मानवाच्या नजरेपेक्षा आठ पट तीक्ष्ण! याच्यापासून वाचण्यासाठी अनेक पक्षी आपले रंग बदलतात किंवा त्यांच्या रंगांसारख्या रंगांच्या झाडांमध्ये लपून बसतात. खंड्या पक्षी पटकन पाण्यात सूर मारतो. तर सातभाई पक्षी एक मोठी रॅली तयार करतात आणि हाकलवून लावण्याचा प्रयत्न करतात. कोतवाल पक्षी नक्कल करून कधीकधी शिक्र्याला हुलकावणी देवून त्याचे भक्ष्य पळवतो. शिक्रा पक्ष्याची मान अक्षरशः ३६० डिग्रीमध्ये गोल फिरते.  


या पक्ष्याचे घरटे अगदी साधे काड्यांचे असते. कधीकधी तारांचा देखील उपयोग केला जातो. हे घरटे कावळ्याच्या घरट्यासारखे दिसते. घरटे बांधायला नर आणि मादी दोघेही श्रम करतात. हे बहुतेक सगळ्या पक्ष्यांमध्ये दिसते. हे पक्षी एका वेळी तीन चार अंडी देतात. आणि समजा एखादे अंडे कुणी पळवलेच किंवा इतर काही कारणाने नाहीसे झाले तर त्याच्या बदली नवीन अंडे घालतात. एका सिझनला जास्तीत जास्त सात अंडी घालतात. यांच्या उबवण्याचा कालावधी १८ ते २१ दिवसांचा असतो. आमच्या बागेतील शिक्र्याने पिल्ले बाहेर आल्यावर सुरुवातीला त्यांना खायला घातले. हळूहळू ती पिल्ले बाहेर पडून फांद्यांवर बसायला लागली. मग हळूहळू उडून शेजारच्या झाडावर बसायला लागली. मग ही झेप हळूहळू वाढली. आईने आणि वडीलांनी यांना शिकार करायला शिकवले. हे सगळे प्रशिक्षण पाहणेदेखील अद्भुत अनुभव म्हणायला हवा. किती सहज आणि लवकर ही पिल्ले स्वावलंबी होतात. या पक्ष्यांचे आयुष्य केवळ २.५ ते ७ वर्षांचे असते.

सहज सांगायचे तर आपल्या भारतीय नौसेनेच्या हेलिकॉप्टर बेसचे नाव आयएनएस शिक्रा असे दिलेले होते.  
  
फोटो आणि व्हिडिओ - सुजाता बाबर