Tuesday, 7 March 2017

भारदस्त भारद्वाज

लहानपणी आम्हाला भारद्वाज पक्ष्याची एक गोष्ट सांगितली जायची. झाडावर भारद्वाज दिसला की त्या झाडाला तीन प्रदक्षिणा घालायच्या म्हणजे इच्छा पूर्ण होतात. आणि हो, या फेऱ्या पूर्ण होईपर्यंत भारद्वाज मात्र उडून जायला नको. आणि समजा, जोडी असेल तर मात्र तुम्ही अगदी भाग्यवान! मग आम्ही भारद्वाज कुठल्या झाडावर आहे का हे शोधत बसायचो. बहुदा मुलांना घराबाहेर काढायचा हा एक मार्ग असावा. 
जमिनीवर पाला पाचोळ्या मधे फिरणारा पक्षी 
आता मात्र आमच्या बागेत आम्हाला रोजच भारद्वाज दिसतो. ग्रेटर कौकल किंवा क्रो फिझंट ही या पक्ष्याची इंग्रजी नावे. याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस साईनेसिस (Centropus sinesis) असे आहे. मराठीत भारद्वाज, कुंभार कावळा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. तसेच लाल कावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्क्कुटकुंबा, कुक्कुडकोंबा ही सुद्धा भारद्वाजाची वेगवेगळी नावे आहेत.  

मोरासारखा डौलदार भरारी घेणारा. ही भरारी घेत असताना याचे तपकिरी सोनेरी पंख अतिशय सुंदर दिसतात. भारद्वाज हा भारतात आणि पूर्व आशियामध्ये अगदी सामान्यपणे दिसणारा पक्षी आहे. हा भारतापासून ते दक्षिण चीन व इंडोनेशिया पर्यंत सगळीकडे आढळतो.


डोके काळे, तर जांभळ्या छटा असलेले काळेशार अंग असते आणि त्याला
सोनेरी पक्षी 
एक अनोखी चकाकी असते. पाठ आणि पंख मात्र तांबूस पिंगट तपकिरी रंगाचे असतात. हा रंग देखील सोनेरी रंगासारखा चकाकत असतो. डोळे मात्र अगदी भेदक आणि लाल भडक असतात. याचा आकार साधारण ४५ सेंटीमीटर इतका असतो. म्हणजे डोमकावळ्यासारखा. आणि वजन साधारण २३० ते २७० ग्रॅम इतके असते. नर आणि मादी दोघेही दिसायला सारखेच असतात. भारद्वाज जरी ककु कुटुंबातील सदस्य असला तरी हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून जाणारा पक्षी नाही. यामुळे तो स्वतःचे आब राखून असतो. बहुदा यामुळेच त्याला एक वेगळा डौल असतो. सावंतवाडीचा शहरपक्षी म्हणून भारद्वाज निवडून आला आहे.  

तहानलेला असला तरी डौल पहा!  
हा पक्षी अगदी कुठेही आढळतो. मानवी वस्तीच्या जवळ, मैदानी, गवताळ प्रदेशात, झाडाझुडूपात देखील आढळतो. बहुदा त्याला जमिनीवर रहायला आवडत असावे. आमच्या बागेमध्ये बहुदा रोजच जमिनीवर फिरताना दिसत असतो. अनेकदा जोडीने असतो. जमिनीवरचे किडे, अळ्या टिपत असतो. आणि अगदी बिनधास्त फिरत असतो. त्याला इतर गोष्टींचे फारसे भय वाटत नाही. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेताना अतिशय सुंदर दिसतो. लहान मोठे किडे, पाली, सुरवंट, उंदीर, सरडा हे या पक्ष्याचे मुख्य अन्न आहे. तामिळनाडूमध्ये हे पक्षी गोगलगायी खाताना दिसले आहेत. 

ओळखायला अगदी सोपा. झाडांमध्ये जोरजोरात कूप कूप असा आवाज आला की भारद्वाज आहे हे लगेच समजते. आणि गंमत म्हणजे एका पक्षाने आवाज काढायला सुरुवात केली की दुसरा देखील आवाज काढायला लागतो. आणि एकदा सुरुवात केली की किमान २० वेळा तरी आवाज काढतच राहतो. सकाळी साधारण १० वाजेपर्यंत आणि दुपारी चारच्या सुमारास हे पक्षी सक्रीय होतात. सकाळी-सकाळी उन्हामध्ये पंख वळवत असतात.   
नर पक्षी मादीला खुश करण्यासाठी नजराणा म्हणून खाऊ आणतो. मादी खुश झाली की शेपटी खाली करते आणि पंख मिटवून घेते. बहुदा हे तिचे 
शांतपणे रमणारी जोड़ी 
लाजणे असावे. सप्टेंबर हा विणीचा हंगाम असतो. घरटे तीन ते आठ दिवसांमध्ये बांधून होते. जमिनीपासून साधारण सहा मीटर उंचीवर घरटे बांधले जाते. एका वेळी ३ ते ५ अंडी घालतात. काही वेळा कावळे या अंड्यांवर हल्ला करून फोडून टाकतात.   


भारतामध्ये याला श्रद्धास्थान मानले गेले आहे. भारद्वाज नावाचे ऋषी देखील पुराणांमध्ये आहेत. या पक्ष्याशी निगडीत अनेक अंधश्रद्धा आणि विश्वास आहेत. काहीही असो, हा पक्षी मला रोज दिसतो, याचे चालणे, उडणे, भरारी घेणे हे सगळे पाहायला मजा येते. हे सगळे अतिशय ग्रेसफुल आहे.




फोटो व व्हिडिओ: सुजाता बाबर 

या पक्षयाचा आवाज ऐका :
http://www.xeno-canto.org/species/centropus-sinensis?view=3

Thursday, 23 February 2017

अद्भुत निळ्या रंगाचा गूढ निलांग

आमच्या खिडकीबाहेर तुतीचे झाड होते. काही कारणाने त्याला कीड पडली आणि ते जळून गेले. त्या झाडाने मला बरेच काही शिकवले. त्यावर एवढे वेगवेगळे पक्षी यायचे की अनेकदा एकाच वेळी वेगवेगळे कॉल्स ऐकू यायचे आणि गोंधळ उडायचा. एकदा अशीच काम करीत बसले होते. आणि मागून अगदी नाजूक असा चिवचिवाट ऐकू आला. इतका नाजूक की चिमणी नक्कीच नव्हती. कुतूहलाने पाहायला गेले तर गर्द पानांच्या आड निळसर रंग दिसला. मला आधी वाटले काहीतरी कापड किंवा प्लास्टीकची पिशवी अडकली असावी. पण नाही, तो तर सुंदर अद्भुत अशा निळ्या रंगाचा पक्षी होता. 
नर नीलांग 


मी हा पक्षी प्रथमच पाहत होते. मला नाव माहीत नव्हते. मग पुस्तकं बाहेर काढली. हा तर नीलांग. कॅमेरा आणेपर्यंत उडून देखील गेला. एखाद्या गूढ सिनेमासारखं वाटलं. अगदी थोडा वेळ दर्शन देऊन निघून गेला. पण गंमत म्हणजे पुन्हा दुसऱ्या दिवशी तो आला. आणि एखादा पक्षी तुतीच्या झाडावर आला की हमखास परत येत असे हे मला अनुभवाने समजले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी कॅमेरा अगदी सज्ज ठेवला होता. दुसऱ्या दिवशी तो ठरल्याप्रमाणे आला. बराच वेळ थांबला. मला त्याचे पुष्कळ फोटो काढता आले आणि व्हिडीओ देखील घेता आला.

नीलांग म्हणजे व्हर्डीटर फ्लायकॅचर. याचे शास्त्रीय नाव आहे, Eumyias thalassina. याला मोरकंठी लिटकुरी असेही नाव आहे. साधारण १५ सेंटीमीटर लांब. नर हा थोडासा गडद हिरवट निळ्या रंगाचा असतो, तसेच त्याची चोच व डोळ्याखाली काळा रंग असतो. मादी फिक्या रंगाची असते, शिवाय अंगावर राखाडी छटा असते. हवेत उडणारे कीटक पटकन पकडायची सवय असते म्हणून याला फ्लायकॅचर असे म्हणतात. हा पक्षी इतका चंचल असतो की दिसला की दुसऱ्या मिनिटाला नाहीसा होतो. बहुदा म्हणूनच याला गूढ पक्षी म्हणत असावेत.  
सुंदर निळा रंग आणि काजळ घातल्यासारखे डोळे 


एप्रिल ते जुलै हा याचा प्रजनन काळ. हे पक्षी झाडांच्या मोकळ्या मुळ्यांमध्ये किंवा पडक्या भिंतीच्या आतमध्ये घरटे बांधतात. एका वेळी ३ ते ४ अंडी देतात. अर्थातच सगळी देखभाल नर आणि मादी करतात.  

हा पक्षी दिसायला अतिशय मनमोहक असतो. हिरवट आणि गर्द निळा  रंग आणि काजळ घातल्यासारखे डोळे त्यामुळे कुठूनही लक्ष वेधून घेतो. अनेकदा निळ्या रंगामुळे नीलांग पक्ष्याला चुकून नीलपरी, जांभळी लिटकुरी समजले जाते. 
हिरव्या पानांमध्ये लपून राहणारा 
परंतु नीलपरी, जांभळी लिटकुरी या पक्ष्याच्या खालचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो आणि मानेला नेकलेस सारखा काळा रंग असतो. याचे वास्तव्य भारतात आणि जवळपास सगळ्या आशियाई देशांमध्ये सापडतो. साधारणपणे खुल्या रानात किंवा छतावर हा पक्षी दिसतो. पक्ष्यांमध्ये मोर हा काही फक्त निळ्या रंगाचा मनोहर पक्षी नाही तर नीलांग देखील मोरासारखा नयनरम्य दर्शन देणारा पक्षी आहे. तुम्ही पाहिला की तुम्हाला नक्की पटेल. 



फोटो आणि व्हिडिओ : सुजाता बाबर 

Thursday, 16 February 2017

गोड गळ्याचा दयाळ

आपल्याला गोड गळ्याचा पक्षी म्हटले की कोकीळ आठवतो. पण इतर अनेक पक्षी आहेत ज्यांचे आवाज किंवा कॉल्स अत्यंत गोड आहेत. यातला एक सुरेल गाणारा पक्षी म्हणजे दयाळ. काळ्यापांढऱ्या रंगाचा पण अगदी डौलदार. आमच्या बागेत तर यांचे गुंजन सतत चालूच असते. इकडून तिकडे बागडत असतात. कित्येकदा यांच्या आवाजाने सकाळी सकाळी मस्त जाग येते. दिवसाची सुरुवात अशा सुरेल गजराने होणे याशिवाय काय हवे?
असा हा दयाळ किंवा रॉबिन. पूर्ण नाव ओरिएन्टल मॅगपाय रॉबिन. याचा समावेश म्युझिकापिडी (Musicapidae) या पक्षिकुलात आणि टर्डिडी या उपकुलात समावेश होतो. शास्त्रीय नाव कॉप्सिकस सॉलॅरिस (Copsychus saularis). 
याच्या काही वैशिष्ट्यांवरून या पक्ष्याची बोलीभाषेमध्ये अनेक नावे आहेत. गोडी लोक उसळी म्हणतात. भिल्ल लोक काबरो म्हणतात. पारधी कालाचिडी म्हणतात. नाशिकमध्ये काळचिडी तर पुण्यात दयाळ म्हणतात. चंद्रपूर मध्ये दहीगोल, माडिया भाषेत दहेंडी आणि सिंधुदुर्गमध्ये मडवळ म्हणतात. अंगावर दही सांडल्यासारखे पांढरे स्वरूप असल्याने याला दाधिक असेही म्हणतात. संस्कृतमध्ये दाधिक म्हणजे दही विकणारा.  
काळा, सुमधुर दयाळ 


हा पक्षी तसा सगळीकडे दिसतो. पानझड, तलाव, नदीकाठ, झुडुपे, वाळलेली झाडे, बगीचा अशा अनेक ठिकाणी आढळतो. आम्ही बागेत काही लाकडी घरे ठेवली होती. त्यातल्या एका घरामध्ये याने आपले घरटे केले होते. आकाराने चिमणीपेक्षा थोडासा मोठा असतो. साधारण २० सेंमी. लांब असतो. नर पक्षी अधिक काळा असतो. डोके, मान, पाठ काळी असते. तर मादीचा डोक्याचा भाग करड्या रंगाचा असतो. सतत हालचाल हे याचे वैशिष्ट्य आहे. अगदी स्थिर बसला तरी शेपटी सतत वरखाली हलवीत असतो. 
सतत शेपटी हलवित असतो 
याच्या मधुर आवाजामुळे चटकन ओळखू येतो. आवाज अगदी स्पष्ट आणि खणखणीत व लांब शीळ घातल्यासारखा असतो. शिवाय इतर पक्ष्यांच्या नकला देखील करतो. शिवाय जवळपास मांजर किंवा मुंगुस दिसले की आपल्या आवाजाने इतरांना सावधान करतो. आणि हा पक्षी केवळ गोड आवाज काढत नाही. तर त्याला घाबरलेले, आक्रमक, सावधानतेचा इशारा देणारे, नम्र, विनंती करणारे, संकटाची जाणीव करून देणारे असे अनेक आवाज काढता येतात.
वीणीच्या हंगामात मादीला साद घालतो आहे 
यांचा विणीचा हंगाम म्हणजे फेब्रुवारी ते ऑगस्ट. एका वेळी ३ ते ५ अंडी घालतात अंडी पिवळट पंढरी किंवा अगदी फिक्या हिरव्या रंगाची असतात. उबवण्याचा काळ ८ - १५ दिवसांचा असतो. याचे आयुष्य साधारण १० वर्षांचे असते.
याचे आवडते खाद्य म्हणजे कीटक, अळ्या, मुंग्या, टोळ. तसेच फुलांच्या मधला रस, मध हेदेखील त्याला खूप आवडते. हे पक्षी जवळपास असावेत असे वाटत असेल तर पांगारा, काटेसावर झाडे लावावीत. यांच्या फुलांमधला रस याला खूप आवडतो. तसेच आकार जरी लहान असला तरी बेडूक आणि सरडे हे देखील याचे खाद्य आहे. यामुळे याला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते.

साधासा  अधिवास 
गोड गळ्याचा पक्षी असल्याने पूर्वी या पक्ष्याला पकडून पिंजऱ्यात ठेवत असत. दयाळ पक्षी बांगला देश, भारत, श्रीलंका आणि पूर्व पाकिस्तान, पूर्व इंडोनेशिया ते थायलंड, दक्षिण चीन, मलेशिया आणि सिंगापूरपर्यंत दिसतो. आता ऑस्ट्रेलियामध्येदेखील दिसतो. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दयाळ हा बांगला देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. तिथे दोयेल चटवार नावाने ओळखला जातो. बांगला देशामध्ये अनेक ठिकाणी सांकेतिक चिन्ह म्हणून या पक्ष्याला स्थान दिले आहे. बांगला देशाच्या नोटांवर याचे चित्र आहे. तसेच ढाका शहरात या पक्ष्यांचे मोठे शिल्प आहे आणि एक मोठी ओळखीची खूण म्हणून सांगितले जाते. असा हा सुंदर आणि गोड पक्षी.

फोटो आणि व्हिडिओ: सुजाता बाबर  



Thursday, 9 February 2017

सोन्यासारखा पिवळा हळद्या

आम्ही नवीन जागेत रहायला आलो तेव्हा मागच्या पडीक जमिनीमध्ये काही झाडे लावली. जमीन सिमेंट आणि दगडांनी खूप खराब झालेली होती. साफ करून अशी झाडे लावली जिथे भरपूर पक्षी येतील. यात तुतीचे झाड खूप महत्त्वाचे. यामुळे तुती खायला खूप पक्षी येतात. आमच्या आसपासच्या घरांमध्ये आंब्याची खूप झाडे आहेत आणि उंच दाट निलगिरीची झाडे आहेत. त्यामुळे पक्षी आले तरी या उंच आणि दाट झाडांमध्ये लपून जात. हळद्या हा पक्षी अतिशय पिवळा धम्मक.
पिवळ्या आणि गुलाबी रंगाची उधळण
याचे इंग्रजी नाव म्हणजे गोल्डन ओरिओल. अगदी सोन्यासारखा पिवळा आणि गुलाबी चोच म्हणजे जणू काही कोणीतरी मेकअप करून पाठवावे इतका सुंदर पक्षी. सुरुवातीला दाट झाडांमध्ये फक्त पिवळ्या रंगाच्या छटा दिसायच्या. अगदी झलक दिसली तरी मला आनंद व्हायचा. 
गडद  रंगाचा नर 
आमचे तुतीचे झाड मोठे झाले आणि पक्षांची जणू मांदियाळी वाटावी असे ते झाड पक्ष्यांनी बहरून जायचे. हळद्या देखील यायला लागला. पण फोटो काढण्यासाठी कॅमेराचा जरा जरी आवाज झाला तरी उडून जायचा. त्यामुळे बरेचदा खिडकीच्या काचेतून फोटो घ्यावे लागायचे. पण हळूहळू तुती खाण्यामध्ये दंग झालेल्या हळद्याला मला टिपता येऊ लागले. 
फोटो काढण्यापेक्षा मी त्याला पाहण्यातच गुंग होऊन जात असे. हा आपल्याकडे दिसणारा सामान्य पक्षी. 
किंचित फिक्या  रंगाची मादी

जितका सुंदर तितका त्याचा आवाज चिरका, एकसुरी. पण अगदी विशिष्ट आवाज. अगदी मधुर नसला तरी वैशिष्ट्यपूर्ण! भारतात दिसणारा हळद्या हा स्थानिक पक्षी आहे. पण इतर अनेक देशांमध्ये स्थलांतरित होणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. मराठीत हळद्या किंवा पिलक अशा नावांनी ओळखला जातो. शास्त्रीय नाव आहे Oriolus oriolus.  
बहुदा हे पक्षी जोडीमध्ये आढळतात. नर हा गडद पिवळा आणि पंख काळे असतात. तसेच डोळ्याखाली काजळ घातल्यासारखी पट्टी असते. मादी किंचित फिक्या पिवळ्या रंगाची असते. फुलांमधला मध, फळे आणि किडे हे याचे मुख्य अन्न. एप्रिल ते जुलै हा विणीचा हंगाम असतो. घरटे गवताचे आणि लहानसेच असते. एका वेळी २ ते ३ अंडी घालतात. उबवणीचा काळ १५ ते १८ दिवसांचा असतो. सगळे काम नर आणि मादी मिळून करतात. पिल्ले सुरुवातीचे १५ - २० दिवस  घरट्यात राहतात. हळूहळू बाहेर पडतात. पिल्लाना “मोठे” व्हायला एक वर्ष लागते.  
सौंदर्याची खाण  

उंचीला ८ ते नऊ इंच असतो आणि वजन असते अवघे २० ते २८ ग्रॅम. डोळे गडद लाल असतात. याचे पंख साधारण १७ ते १८ इंच पसरतात. याची झेप अगदी थेट आणि सरळ असते. दिवसा यांची चलबिचल चाललेली असते. बिया इकडे तिकडे वाहून नेण्यामध्ये या पक्ष्याची मदत होते. बहिरी ससाणा, गरुड अशा प्रकारचे शिकारी पक्षी हे हळद्याचे शत्रू. याचे आयुष्य साधारण ९ ते १० वर्षांचे असते. 

नाशिकच्या आसपास पक्षी निरीक्षण करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे कुठेही गेले तरी हळद्या हमखास दिसतो.     .
फोटो: सुजाता बाबर