Tuesday, 30 May 2017

खट्याळ खाटीक

आमच्या बागेतील झाडे मोठी व्हायला लागली आणि हळूहळू पक्षी दिसायला लागले. सुरुवातीला अगदी बुलबुल दिसला तरी मला खूप आनंद व्हायचा. हळूहळू अनेक पक्षी दिसू लागले. यामध्ये पहिल्या काही पक्ष्यांमध्ये एक पक्षी होता खाटिक.
अगदी चिरका आवाज पण दिसायला मात्र साफ सुतरा. मागे बाभळीचे झाड होते. त्यावर हमखास बसलेला असायचा. कधीकधी वेगवेगळ्या पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा आवाज काढायचा. यामुळे अनेकदा याला नकल्या असेही म्हणतात. याचे बोलीभाषेतील आणि मराठी नाव म्हणजे खाटिक किंवा कसाई (शास्त्रीय नाव आहे लॅनियस शॅक - Lanius schach). 
आकाराने तसा फार मोठा नसतो. साधारण २५ सेमी लांबीचा. वजन साधारण ६० ते ७० ग्रॅम. याच्यामध्ये दोन रंगांचे श्राईक अधिक आढळतात. एक म्हणजे तपकिरी आणि दुसरा राखाडी. आमच्या घरामागे राखाडी श्राईक (Grey shrike) कधीच दिसला नाही. नेहमी तपकिरी रंगाचा खाटिक दिसायचा. याचे डोके राखट रंगाचे असते. पोट पांढरे आणि शेपटी काळ्या रंगाची आणि लांब. पाठीच्या खाली आणि कमरेचा भाग तांबूस तपकिरी असतो. 
हा एक मांसाहारी पक्षी आहे. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची शिकार तो काटेरी झाडाच्या काट्यांना खोचून ठेवतो आणि भूक लागली की हवे तेवढी तुकडे करून टोचून खातो. त्यामुळे ज्या बाभळीच्या झाडावर खाटिक
राहत असतो तिथे काट्यांना अळ्या, पाली खोचून ठेवलेल्या दिसतील. जेव्हा शिकार खोचतो तेव्हा ती त्या प्राण्याच्या डोक्याची कवटी फोडून ती खोचून ठेवतो. त्यामुळे तो प्राणी पटकन मरून जातो. त्याची शिकार म्हणजे कोण असते तर, अळ्या, टोळ, नाकतोडे, बेडूक, सरडे, लहान पक्षी, रानउंदरांची पिल्ले. खाटिक मोठा संधीसाधू पक्षी आहे. भूक नसली तरी जेव्हा शिकार मिळेल तेव्हा करून ती शिकार काटेरी झाडावर साठवून ठेवतो. एखादी शिकार तो जास्तीत जास्त ९ दिवस साठवतो आणि पुरवून खातो. शिवाय अशी शिकार खोचून ठेवण्यामुळे तो त्याचे जणू साम्राज्य जाहीर करत असतो. शिवाय मादी खाटिक पक्ष्याला आकर्षित करण्याचे हे एक त्याचे तंत्र असते. त्याच्या खोचून ठेवण्याच्या सवयीमुळे याचे नाव खाटिक असे पडले. 
हे पक्षी तसे सगळीकडे आढळतात. प्रामुख्याने उत्तर अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये आढळतात. शेतजमीन, जंगल, झाडेझुडपे, काटेरी झुडपे अशा प्रदेशांमध्ये दिसतो. 
खाटिक पक्षाला दुसरे मराठी नाव म्हणजे गांधारी. गांधारी पक्ष्याच्या डोळ्यावर गडद काळ्या रंगाची रेष असते. जणू काही गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधली आहे असे वाटते म्हणून हे नाव. 
या पक्ष्याच्या अनेक जाती आहेत. आजपर्यंत एकूण ३० जाती नोंदवल्या आहेत. या सगळ्यांमध्ये एक प्रमुख  साम्य म्हणजे लांब काळी शेपटी.   
आम्ही त्याच्या श्राईक नावामुळे गमतीने त्याला शिर्के साहेब असे म्हणत असतो.