Thursday, 23 February 2017

अद्भुत निळ्या रंगाचा गूढ निलांग

मच्या खिडकीबाहेर तुतीचे झाड होते. काही कारणाने त्याला कीड पडली आणि ते जळून गेले. त्या झाडाने मला बरेच काही शिकवले. त्यावर एवढे वेगवेगळे पक्षी यायचे की अनेकदा एकाच वेळी वेगवेगळे कॉल्स ऐकू यायचे आणि गोंधळ उडायचा. एकदा अशीच काम करीत बसले होते. आणि मागून अगदी नाजूक असा चिवचिवाट ऐकू आला. इतका नाजूक की चिमणी नक्कीच नव्हती. कुतूहलाने पाहायला गेले तर गर्द पानांच्या आड निळसर रंग दिसला. मला आधी वाटले काहीतरी कापड किंवा प्लास्टीकची पिशवी अडकली असावी. पण नाही, तो तर सुंदर अद्भुत अशा निळ्या रंगाचा पक्षी होता. 
नर नीलांग 


मी हा पक्षी प्रथमच पाहत होते. मला नाव माहीत नव्हते. मग पुस्तकं बाहेर काढली. हा तर नीलांग. कॅमेरा आणेपर्यंत उडून देखील गेला. एखाद्या गूढ सिनेमासारखं वाटलं. अगदी थोडा वेळ दर्शन देऊन निघून गेला. पण गंमत म्हणजे पुन्हा दुसऱ्या दिवशी तो आला. आणि एखादा पक्षी तुतीच्या झाडावर आला की हमखास परत येत असे हे मला अनुभवाने समजले होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी मी कॅमेरा अगदी सज्ज ठेवला होता. दुसऱ्या दिवशी तो ठरल्याप्रमाणे आला. बराच वेळ थांबला. मला त्याचे पुष्कळ फोटो काढता आले आणि व्हिडीओ देखील घेता आला.

नीलांग म्हणजे व्हर्डीटर फ्लायकॅचर. याचे शास्त्रीय नाव आहे, Eumyias thalassina. याला मोरकंठी लिटकुरी असेही नाव आहे. साधारण १५ सेंटीमीटर लांब. नर हा थोडासा गडद हिरवट निळ्या रंगाचा असतो, तसेच त्याची चोच व डोळ्याखाली काळा रंग असतो. मादी फिक्या रंगाची असते, शिवाय अंगावर राखाडी छटा असते. हवेत उडणारे कीटक पटकन पकडायची सवय असते म्हणून याला फ्लायकॅचर असे म्हणतात. हा पक्षी इतका चंचल असतो की दिसला की दुसऱ्या मिनिटाला नाहीसा होतो. बहुदा म्हणूनच याला गूढ पक्षी म्हणत असावेत.  
सुंदर निळा रंग आणि काजळ घातल्यासारखे डोळे 


एप्रिल ते जुलै हा याचा प्रजनन काळ. हे पक्षी झाडांच्या मोकळ्या मुळ्यांमध्ये किंवा पडक्या भिंतीच्या आतमध्ये घरटे बांधतात. एका वेळी ३ ते ४ अंडी देतात. अर्थातच सगळी देखभाल नर आणि मादी करतात.  

हा पक्षी दिसायला अतिशय मनमोहक असतो. हिरवट आणि गर्द निळा  रंग आणि काजळ घातल्यासारखे डोळे त्यामुळे कुठूनही लक्ष वेधून घेतो. अनेकदा निळ्या रंगामुळे नीलांग पक्ष्याला चुकून नीलपरी, जांभळी लिटकुरी समजले जाते. 
हिरव्या पानांमध्ये लपून राहणारा 
परंतु नीलपरी, जांभळी लिटकुरी या पक्ष्याच्या खालचा भाग पांढऱ्या रंगाचा असतो आणि मानेला नेकलेस सारखा काळा रंग असतो. याचे वास्तव्य भारतात आणि जवळपास सगळ्या आशियाई देशांमध्ये सापडतो. साधारणपणे खुल्या रानात किंवा छतावर हा पक्षी दिसतो. पक्ष्यांमध्ये मोर हा काही फक्त निळ्या रंगाचा मनोहर पक्षी नाही तर नीलांग देखील मोरासारखा नयनरम्य दर्शन देणारा पक्षी आहे. तुम्ही पाहिला की तुम्हाला नक्की पटेल. 



फोटो आणि व्हिडिओ : सुजाता बाबर 

Thursday, 16 February 2017

गोड गळ्याचा दयाळ

पल्याला गोड गळ्याचा पक्षी म्हटले की कोकीळ आठवतो. पण इतर अनेक पक्षी आहेत ज्यांचे आवाज किंवा कॉल्स अत्यंत गोड आहेत. यातला एक सुरेल गाणारा पक्षी म्हणजे दयाळ. काळ्यापांढऱ्या रंगाचा पण अगदी डौलदार. आमच्या बागेत तर यांचे गुंजन सतत चालूच असते. इकडून तिकडे बागडत असतात. कित्येकदा यांच्या आवाजाने सकाळी सकाळी मस्त जाग येते. दिवसाची सुरुवात अशा सुरेल गजराने होणे याशिवाय काय हवे?
असा हा दयाळ किंवा रॉबिन. पूर्ण नाव ओरिएन्टल मॅगपाय रॉबिन. याचा समावेश म्युझिकापिडी (Musicapidae) या पक्षिकुलात आणि टर्डिडी या उपकुलात समावेश होतो. शास्त्रीय नाव कॉप्सिकस सॉलॅरिस (Copsychus saularis)
याच्या काही वैशिष्ट्यांवरून या पक्ष्याची बोलीभाषेमध्ये अनेक नावे आहेत. गोडी लोक उसळी म्हणतात. भिल्ल लोक काबरो म्हणतात. पारधी कालाचिडी म्हणतात. नाशिकमध्ये काळचिडी तर पुण्यात दयाळ म्हणतात. चंद्रपूर मध्ये दहीगोल, माडिया भाषेत दहेंडी आणि सिंधुदुर्गमध्ये मडवळ म्हणतात. अंगावर दही सांडल्यासारखे पांढरे स्वरूप असल्याने याला दाधिक असेही म्हणतात. संस्कृतमध्ये दाधिक म्हणजे दही विकणारा.  
काळा, सुमधुर दयाळ 


हा पक्षी तसा सगळीकडे दिसतो. पानझड, तलाव, नदीकाठ, झुडुपे, वाळलेली झाडे, बगीचा अशा अनेक ठिकाणी आढळतो. आम्ही बागेत काही लाकडी घरे ठेवली होती. त्यातल्या एका घरामध्ये याने आपले घरटे केले होते. आकाराने चिमणीपेक्षा थोडासा मोठा असतो. साधारण २० सेंमी. लांब असतो. नर पक्षी अधिक काळा असतो. डोके, मान, पाठ काळी असते. तर मादीचा डोक्याचा भाग करड्या रंगाचा असतो. सतत हालचाल हे याचे वैशिष्ट्य आहे. अगदी स्थिर बसला तरी शेपटी सतत वरखाली हलवीत असतो. 
सतत शेपटी हलवित असतो 
याच्या मधुर आवाजामुळे चटकन ओळखू येतो. आवाज अगदी स्पष्ट आणि खणखणीत व लांब शीळ घातल्यासारखा असतो. शिवाय इतर पक्ष्यांच्या नकला देखील करतो. शिवाय जवळपास मांजर किंवा मुंगुस दिसले की आपल्या आवाजाने इतरांना सावधान करतो. आणि हा पक्षी केवळ गोड आवाज काढत नाही. तर त्याला घाबरलेले, आक्रमक, सावधानतेचा इशारा देणारे, नम्र, विनंती करणारे, संकटाची जाणीव करून देणारे असे अनेक आवाज काढता येतात.
वीणीच्या हंगामात मादीला साद घालतो आहे 
यांचा विणीचा हंगाम म्हणजे फेब्रुवारी ते ऑगस्ट. एका वेळी ३ ते ५ अंडी घालतात अंडी पिवळट पंढरी किंवा अगदी फिक्या हिरव्या रंगाची असतात. उबवण्याचा काळ ८ - १५ दिवसांचा असतो. याचे आयुष्य साधारण १० वर्षांचे असते.
याचे आवडते खाद्य म्हणजे कीटक, अळ्या, मुंग्या, टोळ. तसेच फुलांच्या मधला रस, मध हेदेखील त्याला खूप आवडते. हे पक्षी जवळपास असावेत असे वाटत असेल तर पांगारा, काटेसावर झाडे लावावीत. यांच्या फुलांमधला रस याला खूप आवडतो. तसेच आकार जरी लहान असला तरी बेडूक आणि सरडे हे देखील याचे खाद्य आहे. यामुळे याला शेतकऱ्यांचा मित्र म्हटले जाते.

साधासा  अधिवास 
गोड गळ्याचा पक्षी असल्याने पूर्वी या पक्ष्याला पकडून पिंजऱ्यात ठेवत असत. दयाळ पक्षी बांगला देश, भारत, श्रीलंका आणि पूर्व पाकिस्तान, पूर्व इंडोनेशिया ते थायलंड, दक्षिण चीन, मलेशिया आणि सिंगापूरपर्यंत दिसतो. आता ऑस्ट्रेलियामध्येदेखील दिसतो. 

सर्वात महत्त्वाचे म्हणजे दयाळ हा बांगला देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. तिथे दोयेल चटवार नावाने ओळखला जातो. बांगला देशामध्ये अनेक ठिकाणी सांकेतिक चिन्ह म्हणून या पक्ष्याला स्थान दिले आहे. बांगला देशाच्या नोटांवर याचे चित्र आहे. तसेच ढाका शहरात या पक्ष्यांचे मोठे शिल्प आहे आणि एक मोठी ओळखीची खूण म्हणून सांगितले जाते. असा हा सुंदर आणि गोड पक्षी.

फोटो आणि व्हिडिओ: सुजाता बाबर  



Thursday, 9 February 2017

सोन्यासारखा पिवळा हळद्या

म्ही नवीन जागेत रहायला आलो तेव्हा मागच्या पडीक जमिनीमध्ये काही झाडे लावली. जमीन सिमेंट आणि दगडांनी खूप खराब झालेली होती. साफ करून अशी झाडे लावली जिथे भरपूर पक्षी येतील. यात तुतीचे झाड खूप महत्त्वाचे. यामुळे तुती खायला खूप पक्षी येतात. आमच्या आसपासच्या घरांमध्ये आंब्याची खूप झाडे आहेत आणि उंच दाट निलगिरीची झाडे आहेत. त्यामुळे पक्षी आले तरी या उंच आणि दाट झाडांमध्ये लपून जात. हळद्या हा पक्षी अतिशय पिवळा धम्मक.
पिवळ्या आणि गुलाबी रंगाची उधळण
याचे इंग्रजी नाव म्हणजे गोल्डन ओरिओल. अगदी सोन्यासारखा पिवळा आणि गुलाबी चोच म्हणजे जणू काही कोणीतरी मेकअप करून पाठवावे इतका सुंदर पक्षी. सुरुवातीला दाट झाडांमध्ये फक्त पिवळ्या रंगाच्या छटा दिसायच्या. अगदी झलक दिसली तरी मला आनंद व्हायचा. 
गडद  रंगाचा नर 
आमचे तुतीचे झाड मोठे झाले आणि पक्षांची जणू मांदियाळी वाटावी असे ते झाड पक्ष्यांनी बहरून जायचे. हळद्या देखील यायला लागला. पण फोटो काढण्यासाठी कॅमेराचा जरा जरी आवाज झाला तरी उडून जायचा. त्यामुळे बरेचदा खिडकीच्या काचेतून फोटो घ्यावे लागायचे. पण हळूहळू तुती खाण्यामध्ये दंग झालेल्या हळद्याला मला टिपता येऊ लागले. 
फोटो काढण्यापेक्षा मी त्याला पाहण्यातच गुंग होऊन जात असे. हा आपल्याकडे दिसणारा सामान्य पक्षी. 
किंचित फिक्या  रंगाची मादी

जितका सुंदर तितका त्याचा आवाज चिरका, एकसुरी. पण अगदी विशिष्ट आवाज. अगदी मधुर नसला तरी वैशिष्ट्यपूर्ण! भारतात दिसणारा हळद्या हा स्थानिक पक्षी आहे. पण इतर अनेक देशांमध्ये स्थलांतरित होणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. मराठीत हळद्या किंवा पिलक अशा नावांनी ओळखला जातो. शास्त्रीय नाव आहे Oriolus oriolus.  
बहुदा हे पक्षी जोडीमध्ये आढळतात. नर हा गडद पिवळा आणि पंख काळे असतात. तसेच डोळ्याखाली काजळ घातल्यासारखी पट्टी असते. मादी किंचित फिक्या पिवळ्या रंगाची असते. फुलांमधला मध, फळे आणि किडे हे याचे मुख्य अन्न. एप्रिल ते जुलै हा विणीचा हंगाम असतो. घरटे गवताचे आणि लहानसेच असते. एका वेळी २ ते ३ अंडी घालतात. उबवणीचा काळ १५ ते १८ दिवसांचा असतो. सगळे काम नर आणि मादी मिळून करतात. पिल्ले सुरुवातीचे १५ - २० दिवस  घरट्यात राहतात. हळूहळू बाहेर पडतात. पिल्लाना “मोठे” व्हायला एक वर्ष लागते.  
सौंदर्याची खाण  

उंचीला ८ ते नऊ इंच असतो आणि वजन असते अवघे २० ते २८ ग्रॅम. डोळे गडद लाल असतात. याचे पंख साधारण १७ ते १८ इंच पसरतात. याची झेप अगदी थेट आणि सरळ असते. दिवसा यांची चलबिचल चाललेली असते. बिया इकडे तिकडे वाहून नेण्यामध्ये या पक्ष्याची मदत होते. बहिरी ससाणा, गरुड अशा प्रकारचे शिकारी पक्षी हे हळद्याचे शत्रू. याचे आयुष्य साधारण ९ ते १० वर्षांचे असते. 

नाशिकच्या आसपास पक्षी निरीक्षण करण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यामुळे कुठेही गेले तरी हळद्या हमखास दिसतो.     .
फोटो: सुजाता बाबर   

Friday, 3 February 2017

गिरणीवाला तांबट


काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा सकाळी सकाळी अनेक गिरण्या एकाच वेळी चालू आहेत असा भास झाला. खरे तर त्या आवाजाने मला जाग आली. अर्थातच एवढ्या सकाळी कुठे गिरणी चालू असणार! हा तर तांबट पक्षी. पण एवढा आवाज? मी खिडकीबाहेर पहिले, आणि आश्चर्याने माझे डोळे विस्फारले ते कितीतरी वेळ मिटलेच नाहीत. सकाळची वेळ असल्याने फारसा उजेड नव्हता पण एकाच झाडावर अक्षरशः शंभर एक तांबट सहज असतील.
एका झाडावर सुमारे शंभर तांबट!
काही फोटो पण घेतले. पक्षी निरीक्षणाची ओढ जेव्हा लागली तेव्हा तांबट पक्ष्याची हलकीशी झलक जरी दिसली तरी मला खूप आनंद व्हायचा. याचा आवाज अगदी गमतीशीर. तांब्यावर घाव घालावेत असा आवाज. पण मला तर तो गिरणीसारखा (ऑईल इंजिन) वाटतो. आवाज आला की मी तांबट शोधात बसायची. दाट पानांमध्ये लपून बसण्याची सवय असल्याने तसा शोधायला वेळच लागतो. हा पक्षी दिसायला देखील खूपच सुंदर असतो. सामान्यपणे जो तांबट दिसतो, तो पोपटासारखा हिरवा असतो. त्यामुळे पानांमध्ये लपला की पटकन ओळखता येत नाही. ही तांबटाची गिरणी तासनतास चालू राहते.
अतिशय देखणे रूप

या पक्ष्याचे शास्त्रीय नाव आहे Megalaima haemacephala indica. इंग्रजीमध्ये कॉपरस्मिथ बार्बेट किंवा क्रिमसन ब्रेस्टेड बार्बेट. तांब्यावर घाव घातल्यासारखा आवाज काढतो म्हणून हे नाव आले. आपल्याकडे सामान्यपणे दिसणारा. थोडस शहराबाहेर पडले की याचा आवाज हमखास येतो. गिरणीसारख्या लयीत पुक पुक असा आवाज काढतो म्हणून त्याला बोली भाषेत पुकपुक्या असेही म्हणतात. नर आणि मादी फारसे वेगळे दिसत नाहीत. कपाळ आणि छाती किरमिजी रंगाची, डोळ्यांवर आणि खाली पिवळे पट्टे आणि पिवळा कंठ. आणि हिरवेगार अंग. यामुळे अतिशय देखणा दिसतो. चोचीवर मिशांसारखे केस हे देखील याचे वैशिष्ट्य.
तांबट पक्षाची जोडी
फ्रेंच भाषेत दाढीला बार्बेट म्हणतात म्हणून याच्या नावामध्ये बार्बेट आले. या मिशा कीटक पकडण्यासाठी उपयोगी असतात. काही ठिकाणी यांचे वेगवेगळे रंग दिसून येतात. दक्षिण भारतात गेलात तर अजून तीन प्रकारचे तांबट पक्षी पाहायला मिळतील. एक म्हणजे जे तपकिरी रंगाचे डोके
, छाती, कंठ असलेला, दुसरा म्हणजे पांढऱ्या रंगांची डोळ्यांची वरची कडा आणि गाल असलेला, तिसरा म्हणजे गळा व छाती किरमिजी रंगाची पण त्यावर काळा आणि निळा पट्टा असलेला.
त्यांचे घरटे पोकळ असते. यासाठी पोखरायला सोपे अशा मऊ खोड असलेल्या झाडाच्या खोडामध्ये घरटे बनवितात. शक्यतो जोडीने आढळतात. साधारणपणे अंजीर, जांभूळ, उंबर, वड,  पिंपळ अशा झाडांवर आढळून येतो. हे पक्षी खाण्याचे शौकीन असतात. त्यांना फळे खूप आवडतात. तुती, वड-पिंपळाची फळे, फुलांच्या पाकळ्या आवडीने खातात. तसेच किडे-कीटक देखील आवडतात. गंमत म्हणजे शरीराच्या दीड ते दोन पट आहार असतो. यांच्या विणीचा हंगाम म्हणजे फेब्रुवारी ते एप्रिल. नर आणि मादी दोघेही अंडी उबवण्याचे काम करतात.   
या पक्ष्याचा आवाज अगदी लक्षात येण्यासारखा असतो. पुक...पुक... असा लयबद्ध आवाज काढताना त्याची मान एकदा डावीकडे तर एकदा उजवीकडे फिरते. हे बघणे म्हणजे मजेशीर अनुभव असतो. काहीजण हा आवाज ‘टोंक... टोंक...’ आहे असे मानतात तर काहीजण टुक..टुक आहे असे मानतात. 
अप्रतिम सौंदर्याचा नमुना

२०११ मध्ये झालेल्या पक्ष्यांच्या गणनेनुसार मुंबईमध्ये हा पक्षी मोठ्या प्रमाणत आढळल्याने याला मुंबईचा पक्षी म्हणून ओळखले जाते. 

फोटो : सुजाता व मिलिंद बाबर व्हिडिओ: सुजाता बाबर