Saturday, 7 March 2020

हरसूलचा ठेवा


नाशिकच्या आजूबाजूला अनेक डोंगर आणि आदिवासी पट्टे आहेत. त्यातला एक पट्टा म्हणजे हरसूल. हरसूलला कामानिमित्त अनेकदा जाणे होते. पण हरसूलच्या जंगलातली भटकंती मात्र प्रथमच झाली. २२ फेब्रुवारी २०२० रोजी अशोका इंटरनॅशनल स्कूलच्या नेचर क्लबतर्फे ही सहल काढण्यात आली होती. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी नाशिक संस्थेसोबत ही संधी मिळाली. साधारण १८ मुलेमुली, सोबत प्रतीक्षा, पूजा, निखील आणि वन खात्यातील शिरसाट काका होते. कॅमेरा बिघडल्याने प्रथमच मी साधा पॉईंट अँड शूट कॅमेरा घेऊन चालले होते. हरसूल म्हणजे नाशिकच्या पश्चिम घाटाची सुरुवात. हरसुलच्या जंगलाविषयी कुतूहल होतं. या जंगलात अनेक पक्षी दिसतात असं राहा सरांकडून ऐकलं होतं. माझ्यासारख्या पक्षी निरीक्षकाला कोणताही पक्षी दिसला तरी आनंद होतो. मग अगदी चिमणी-कावळे दिसले तरी खूप आवडते. हरसूलसारख्या जंगलात तर मेजवानी असणार याची खात्री होती. याचा अनुभव उतरल्या-उतरल्या आला. बस घाटामध्ये एका मोकळ्या ठिकाणी थांबवली. आम्ही सगळे उतरलो. मुले संख्येने तशी कमी असल्याने मजा येणार होती. सर्वांची ओळख करून झाली. मुलांना प्रतीक्षाने काही सूचना दिल्या आणि जंगलात जाणार तेवढ्यात समोरच्या झाडावर हरियाल दिसला. माझा अत्यंत आवडता पक्षी! 
हरियाल  (गीरच्या जंगलातला(
हरियाल म्हणजे ‘Yellow footed green pigeon.’ हा आपला राज्य पक्षी आहे. त्याच्या हिरव्या-पिवळ्या रंगामुळे पटकन दिसत नाही. पानांमध्ये सहज लपून जातो. यांची संख्या कमी होत चालली आहे आणि वृक्षतोडीमुळे तो भटकत नवी जागा शोधत असतो. हिरवा रंग तर अगदी पाचूसारखा सुरेख असतो. तसा हा पक्षी लाजाळू आहे. हा पक्षी कितीही वेळा दिसला तरी पहायला खूप मजा येते, आनंद मिळतो. 
एकेमेकांमध्ये गुंतलेले उंबर आणि भुताचे झाड 

पुढे जंगलात शिरलो. अनेक प्रकारचे वृक्ष, झाडे पाहिली. यात शिरसाट काका मुलांना झाडांची माहिती देत होते. आंबा, मोह, करवंद, सादडा, काटेसावर, आपटा, हिरवा बांबू, मधळ, धामोडा किंवा डिंक, उंबर, बोर, धायटा, कुहडाळ किंवा भुत्या (Sterculia urens) म्हणजेच घोस्ट ट्री, पांगारा, वड, पिंपळ, उंदीरमार (उंदीर मारण्यासाठी याचा अर्क काढला जातो) अशी अनेक प्रकारची झाडे पाहिली. डिंकाच्या झाडाचा ताजाताजा डिंक काढून खाल्ला. इतका रुचकर कच्चा ताजा डिंक प्रथमच खाल्ला असेल. घोस्ट ट्री नाव ऐकून मुलांना अगदी मजा वाटली.
टेटूच्या शेंगा ऑरोझायलम इंडिकम 
सगळी मुलं या ट्रेकचा आनंद घेत होती. शिवाय कुठे एखादा कॉल ऐकू आला की लगेचच कोणता पक्षी आहे असे प्रतीक्षाला विचारत होती. शिरसाट काका प्रत्येक झाडाची माहिती सांगत होते. शहरात मुलांना झाडांविषयी फार माहिती नसते. त्यामुळे मुलं झाडांची पाने, शेंगा, बिया उचलून सोबत घेत होती. त्यांच्या डोळ्यात उत्साह आणि कमालीची उत्सुकता होती. एवढेच नाही तर कुठे काही प्लास्टीकची बाटली पिशवी दिसली तरी गोळा करीत होती. 
जसेजसे पुढे जात होतो तसे झाडाच्या बुंध्याच्या पायथ्याशी मोठमोठी फनेल वेब्ज दिसत होती. यांची रचना खरोखरच नरसाळ्यासारखी असते. यात एकदा का कीटक शिरला की तो बाहेर पडू शकत नाही! ही रचना शिकार पटकन अडकण्यासाठी केलेली असते.
फनेल वेब 
फनेल वेब स्पायडरच्या काही प्रजाती विषारी आहेत. निसर्गाची कमाल काय असते हे निसर्गात शिरल्याशिवाय कळत नाही. पुढे जाता असताना अनेक पक्षांचा आवाज येत होता. आम्ही एकूण २०-२५ जण असल्याने पक्षी फारसे बाहेर दिसत नव्हते
, पण आवाजावरून मात्र अनेक पक्षी ओळखता येत होते. यात रॉबिन, लाल बुडाचा बुलबुल, शिपाई बुलबुल, पोपट, वटवट्या, वेडा राघू, कोकीळ, लांब शेपटीचा खाटीक, तांबट, कोतवाल, कापशी घार, गिधाड असे अनेक पक्षी दिसले. इथे फॉरेस्ट आऊलेट (म्हणजे रानपिंगळा) दिसतात असे वाचले होते, पण त्याचे काही दर्शन झाले नाही. मला पक्ष्यांचे फोटो काही घेता आले नाहीत याचं वाईट वाटत होतं. परंतु अनुभव महत्त्वाचा! अगदी लहानशा जंगलात किती मोठा ठेवा आहे याचे अप्रूप वाटले.    

Tuesday, 20 June 2017

पंखेवाला नर्तक

म्हाला नेहमी भेटायला येणारा अजून एक अत्यंत गोड पक्षी म्हणजे नर्तक. दिसायला अगदी चिमणीसारखा, फक्त याची शेपटी वर उचललेली असते. डोक्यावर रांगोळी काढावी तशा पांढऱ्या रेषा असतात. दिसायला साधा, पण जादुई पंखा असलेला हा नर्तक अतिशय मनोवेधक नृत्य करत असतो आणि नृत्यासोबत असते त्याचे मंजुळ गाणे. 
अगदी वैशिष्ट्यपूर्ण असा कॉल!
उंच शेपटीची चिमणी

याचा कॉल ऐकू आला की मी खिडकीत जाऊन कितीतरी वेळ पाहात राहायची. गोंडस, गोजिरवाणा असा हा पक्षी, कितीही साधा दिसत असला त्याच्या मधुर कॉलमधून याची नेहमी आनंदी वृत्ती लगेचच लक्षात येते. काही वेळा मात्र चक-चक असा कर्कश्श आवाज देखील काढत असतो. 

डोक्यावर नैसर्गिक रांगोळी
याची लांबी साधरण १२ ते २१ सेंटीमीटर इतकी असते. शरीर पूर्ण काळे नसते तर किंचित तपकिरी आणि राखी रंगाचे असते. पोटाचा, मानेचा रंग पांढरा असतो. डोक्यावर रांगोळीने काढाव्या अशा तीन चार रेषा असतात. भुवया देखील पांढऱ्या रंगाच्या असतात. शेपटीमधली दोन पिसे तपकिरी रंगाची असतात. गाताना तो आपले पंख मोरासारखे पसरतो आणि अक्षरशः मोजून लावली अशी त्याची शेपटी जपानी पंख्यासारखी पसरते. गाण्याच्या लयीप्रमाणे ती शेपटी बंद - उघडी होत असते. शेपटीच्या पंखांवर छानशी नक्षी देखील असते.
हा पक्षी चिमणीसारखाच चपळ असतो. एका जागी शांत बसलाय असे आढळत नाही. सारखे इथून तिथे आणि तिथून इथे असे त्याचे चाललेले असते. ही हालचाल एखाद्या नृत्याप्रमाणे दिसते. म्हणूनच याला नर्तक असे म्हटले जाते. काहीजण याला नाचरा असेही म्हणतात. सर्वसामान्यपणे झाडेझुडपे, जंगलात, बागेत आढळतो.
हा नेहमी जोडीमध्ये असतो. याला माशीपकड्या असेही म्हटले जाते. हा पक्षी सर्व प्रकारच्या माशा, डास, किडे पकडून खात असतो. याचे शास्त्रीय नाव आहे ऱ्हिपिड्युरा आल्बोग्युलॅरीस (Rhipidura albicollis)
याचा विणीचा हंगाम असतो मार्च ते ऑगस्ट. झाडाच्या फांद्यांच्या खाचांमध्ये घरटे बांधतो. गवत, काड्या, धागे जमवून हा पक्षी आपले सुरेख वाटीसारखे घरटे बांधतो. बाहेरून मात्र कोळीष्टके लावलेली असतात. मादी बहुदा तीन अंडी घालते. 
याला इंग्रजीमध्ये फॅनटेल असे म्हणतात ते त्याच्या पंख्यासारख्या शेपटीमुळे. यात अनेक प्रकार आहेत. आमच्याकडे मात्र पांढऱ्या मानेचा नाचरा येत असतो.



फोटो व व्हिडिओ: सुजाता बाबर


Tuesday, 30 May 2017

खट्याळ खाटीक

आमच्या बागेतील झाडे मोठी व्हायला लागली आणि हळूहळू पक्षी दिसायला लागले. सुरुवातीला अगदी बुलबुल दिसला तरी मला खूप आनंद व्हायचा. हळूहळू अनेक पक्षी दिसू लागले. यामध्ये पहिल्या काही पक्ष्यांमध्ये एक पक्षी होता खाटिक.
अगदी चिरका आवाज पण दिसायला मात्र साफ सुतरा. मागे बाभळीचे झाड होते. त्यावर हमखास बसलेला असायचा. कधीकधी वेगवेगळ्या पक्ष्यांचा आणि प्राण्यांचा आवाज काढायचा. यामुळे अनेकदा याला नकल्या असेही म्हणतात. याचे बोलीभाषेतील आणि मराठी नाव म्हणजे खाटिक किंवा कसाई (शास्त्रीय नाव आहे लॅनियस शॅक - Lanius schach). 
आकाराने तसा फार मोठा नसतो. साधारण २५ सेमी लांबीचा. वजन साधारण ६० ते ७० ग्रॅम. याच्यामध्ये दोन रंगांचे श्राईक अधिक आढळतात. एक म्हणजे तपकिरी आणि दुसरा राखाडी. आमच्या घरामागे राखाडी श्राईक (Grey shrike) कधीच दिसला नाही. नेहमी तपकिरी रंगाचा खाटिक दिसायचा. याचे डोके राखट रंगाचे असते. पोट पांढरे आणि शेपटी काळ्या रंगाची आणि लांब. पाठीच्या खाली आणि कमरेचा भाग तांबूस तपकिरी असतो. 
हा एक मांसाहारी पक्षी आहे. या पक्ष्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची शिकार तो काटेरी झाडाच्या काट्यांना खोचून ठेवतो आणि भूक लागली की हवे तेवढी तुकडे करून टोचून खातो. त्यामुळे ज्या बाभळीच्या झाडावर खाटिक
राहत असतो तिथे काट्यांना अळ्या, पाली खोचून ठेवलेल्या दिसतील. जेव्हा शिकार खोचतो तेव्हा ती त्या प्राण्याच्या डोक्याची कवटी फोडून ती खोचून ठेवतो. त्यामुळे तो प्राणी पटकन मरून जातो. त्याची शिकार म्हणजे कोण असते तर, अळ्या, टोळ, नाकतोडे, बेडूक, सरडे, लहान पक्षी, रानउंदरांची पिल्ले. खाटिक मोठा संधीसाधू पक्षी आहे. भूक नसली तरी जेव्हा शिकार मिळेल तेव्हा करून ती शिकार काटेरी झाडावर साठवून ठेवतो. एखादी शिकार तो जास्तीत जास्त ९ दिवस साठवतो आणि पुरवून खातो. शिवाय अशी शिकार खोचून ठेवण्यामुळे तो त्याचे जणू साम्राज्य जाहीर करत असतो. शिवाय मादी खाटिक पक्ष्याला आकर्षित करण्याचे हे एक त्याचे तंत्र असते. त्याच्या खोचून ठेवण्याच्या सवयीमुळे याचे नाव खाटिक असे पडले. 
हे पक्षी तसे सगळीकडे आढळतात. प्रामुख्याने उत्तर अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये आढळतात. शेतजमीन, जंगल, झाडेझुडपे, काटेरी झुडपे अशा प्रदेशांमध्ये दिसतो. 
खाटिक पक्षाला दुसरे मराठी नाव म्हणजे गांधारी. गांधारी पक्ष्याच्या डोळ्यावर गडद काळ्या रंगाची रेष असते. जणू काही गांधारीप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधली आहे असे वाटते म्हणून हे नाव. 
या पक्ष्याच्या अनेक जाती आहेत. आजपर्यंत एकूण ३० जाती नोंदवल्या आहेत. या सगळ्यांमध्ये एक प्रमुख  साम्य म्हणजे लांब काळी शेपटी.   
आम्ही त्याच्या श्राईक नावामुळे गमतीने त्याला शिर्के साहेब असे म्हणत असतो.

Tuesday, 7 March 2017

भारदस्त भारद्वाज

हानपणी आम्हाला भारद्वाज पक्ष्याची एक गोष्ट सांगितली जायची. झाडावर भारद्वाज दिसला की त्या झाडाला तीन प्रदक्षिणा घालायच्या म्हणजे इच्छा पूर्ण होतात. आणि हो, या फेऱ्या पूर्ण होईपर्यंत भारद्वाज मात्र उडून जायला नको. आणि समजा, जोडी असेल तर मात्र तुम्ही अगदी भाग्यवान! मग आम्ही भारद्वाज कुठल्या झाडावर आहे का हे शोधत बसायचो. बहुदा मुलांना घराबाहेर काढायचा हा एक मार्ग असावा. 
जमिनीवर पाला पाचोळ्या मधे फिरणारा पक्षी 
आता मात्र आमच्या बागेत आम्हाला रोजच भारद्वाज दिसतो. ग्रेटर कौकल किंवा क्रो फिझंट ही या पक्ष्याची इंग्रजी नावे. याचे शास्त्रीय नाव सेंट्रोपस साईनेसिस (Centropus sinesis) असे आहे. मराठीत भारद्वाज, कुंभार कावळा अशा वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. तसेच लाल कावळा, सुलक्षणी, कुंभारकुकडी, कुक्क्कुटकुंबा, कुक्कुडकोंबा ही सुद्धा भारद्वाजाची वेगवेगळी नावे आहेत.  

मोरासारखा डौलदार भरारी घेणारा. ही भरारी घेत असताना याचे तपकिरी सोनेरी पंख अतिशय सुंदर दिसतात. भारद्वाज हा भारतात आणि पूर्व आशियामध्ये अगदी सामान्यपणे दिसणारा पक्षी आहे. हा भारतापासून ते दक्षिण चीन व इंडोनेशिया पर्यंत सगळीकडे आढळतो.


डोके काळे, तर जांभळ्या छटा असलेले काळेशार अंग असते आणि त्याला
सोनेरी पक्षी 
एक अनोखी चकाकी असते. पाठ आणि पंख मात्र तांबूस पिंगट तपकिरी रंगाचे असतात. हा रंग देखील सोनेरी रंगासारखा चकाकत असतो. डोळे मात्र अगदी भेदक आणि लाल भडक असतात. याचा आकार साधारण ४५ सेंटीमीटर इतका असतो. म्हणजे डोमकावळ्यासारखा. आणि वजन साधारण २३० ते २७० ग्रॅम इतके असते. नर आणि मादी दोघेही दिसायला सारखेच असतात. भारद्वाज जरी ककु कुटुंबातील सदस्य असला तरी हा इतरांच्या घरट्यात आपले अंडे टाकून निघून जाणारा पक्षी नाही. यामुळे तो स्वतःचे आब राखून असतो. बहुदा यामुळेच त्याला एक वेगळा डौल असतो. सावंतवाडीचा शहरपक्षी म्हणून भारद्वाज निवडून आला आहे.  

तहानलेला असला तरी डौल पहा!  
हा पक्षी अगदी कुठेही आढळतो. मानवी वस्तीच्या जवळ, मैदानी, गवताळ प्रदेशात, झाडाझुडूपात देखील आढळतो. बहुदा त्याला जमिनीवर रहायला आवडत असावे. आमच्या बागेमध्ये बहुदा रोजच जमिनीवर फिरताना दिसत असतो. अनेकदा जोडीने असतो. जमिनीवरचे किडे, अळ्या टिपत असतो. आणि अगदी बिनधास्त फिरत असतो. त्याला इतर गोष्टींचे फारसे भय वाटत नाही. एका झाडावरून दुसऱ्या झाडावर झेप घेताना अतिशय सुंदर दिसतो. लहान मोठे किडे, पाली, सुरवंट, उंदीर, सरडा हे या पक्ष्याचे मुख्य अन्न आहे. तामिळनाडूमध्ये हे पक्षी गोगलगायी खाताना दिसले आहेत. 

ओळखायला अगदी सोपा. झाडांमध्ये जोरजोरात कूप कूप असा आवाज आला की भारद्वाज आहे हे लगेच समजते. आणि गंमत म्हणजे एका पक्षाने आवाज काढायला सुरुवात केली की दुसरा देखील आवाज काढायला लागतो. आणि एकदा सुरुवात केली की किमान २० वेळा तरी आवाज काढतच राहतो. सकाळी साधारण १० वाजेपर्यंत आणि दुपारी चारच्या सुमारास हे पक्षी सक्रीय होतात. सकाळी-सकाळी उन्हामध्ये पंख वळवत असतात.   
नर पक्षी मादीला खुश करण्यासाठी नजराणा म्हणून खाऊ आणतो. मादी खुश झाली की शेपटी खाली करते आणि पंख मिटवून घेते. बहुदा हे तिचे 
शांतपणे रमणारी जोड़ी 
लाजणे असावे. सप्टेंबर हा विणीचा हंगाम असतो. घरटे तीन ते आठ दिवसांमध्ये बांधून होते. जमिनीपासून साधारण सहा मीटर उंचीवर घरटे बांधले जाते. एका वेळी ३ ते ५ अंडी घालतात. काही वेळा कावळे या अंड्यांवर हल्ला करून फोडून टाकतात.   


भारतामध्ये याला श्रद्धास्थान मानले गेले आहे. भारद्वाज नावाचे ऋषी देखील पुराणांमध्ये आहेत. या पक्ष्याशी निगडीत अनेक अंधश्रद्धा आणि विश्वास आहेत. काहीही असो, हा पक्षी मला रोज दिसतो, याचे चालणे, उडणे, भरारी घेणे हे सगळे पाहायला मजा येते. हे सगळे अतिशय ग्रेसफुल आहे.




फोटो व व्हिडिओ: सुजाता बाबर 

या पक्षयाचा आवाज ऐका :
http://www.xeno-canto.org/species/centropus-sinensis?view=3